मुंबई : सहा वर्षांच्या बालिकेसमवेत लोकलखाली उडी घेऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न करणाºया एका महिलेसह तिच्या मुलीचे प्राण रेल्वे प्रवासी व पोलिसांनी दाखविलेल्या प्रसंगावधानामुळे वाचले. फ्लॅटफॉर्मवरून रुळावर उडी मारली असताना पोलिसांनी तिला तातडीने बाहेर काढले. मध्य रेल्वेच्या विक्रोळी रेल्वे स्थानकात चार दिवसांपूर्वी ही घटना घडली होती.
कौटुंबिक कारणास्तव तिने हे कृत्य करीत असल्याची कबुली दिल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले. रेल्वे स्थानकावरील सीसीटीव्ही कॅमेºयात हा सर्व प्रकार चित्रित झाला आहे. चार दिवसांपूर्वी एक महिला दुपारच्या सुमारास सहा वर्षांच्या मुलीसोबत विक्रोळी रेल्वे स्थानकात आली. फलाट क्रमांक दोनवर ती उभी होती. सीएसएमटीला जाणारी लोकल फलाटावर येत असल्याचे पाहून महिलेने तिच्या मुलीसह रुळावर उडी मारली. हा प्रकार काही रेल्वे प्रवाशांच्या लक्षात आला. आरडाओरड करीत दोघा प्रवाशांसह तेथे ड्युटीवर असलेल्या कुर्ला रेल्वे पोलीस ठाण्याच्या महिला कॉन्स्टेबल साक्षी यांनी सहकाºयासमवेत तेथे धाव घेतली. तिला पकडून तातडीने बाहेर काढले. दरम्यान, मोटरमनने ब्रेक मारून लोकल थांबवली. तिच्याकडे विचारपूस केली असता कौटुंबिक कारणामुळे आत्महत्येचे पाऊल उचलल्याचे महिलेने पोलिसांना सांगितले.