रेल्वे मान्सूनशी सामना करण्यासाठी सज्ज
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 30, 2020 09:45 PM2020-05-30T21:45:28+5:302020-05-30T21:45:33+5:30
लॉकडाऊन काळात लोकल सेवा बंद असल्याने काम करणे रेल्वे प्रशासनाला सोयीस्कर गेले.
मुंबई : मध्य आणि पश्चिम रेल्वे प्रशासनाची मान्सूनची पहिल्या टप्यातील कामे पूर्ण होत आली आहेत. रेल्वे प्रशासन एप्रिलच्या अखेरीपासून मान्सून कामे करण्यास सुरुवात केली होती. यासह लॉकडाऊन काळात लोकल सेवा बंद असल्याने काम करणे रेल्वे प्रशासनाला सोयीस्कर गेले.
मध्य रेल्वेच्या मुंबई विभागातील रेल्वे रुळावर पाणी साचण्याच्या ठिकाणी पंप बसविण्यात आले आहेत. नाल्यांची रुंदी वाढविण्यात आली आहे. मुंबई उपनगरामध्ये सामाजिक अंतर राखून नाले साफ करण्यासाठी व नाल्यांतून घाण काढण्यासाठी जेसीबी / पोकलेन्स तैनात आहेत. गटाराची साफसफाई व पुलांच्या साफसफाईची पहिली फेरी पूर्ण झाली आहे. या लॉकडाउन कालावधीत ३ बीआरएन मक स्पेशल्स आणि २ ईएमयू मक स्पेशलद्वारे पुरेसा ब्लॉक घेऊन मक / मलब्याची विल्हेवाट लावली जात आहे, अशी माहिती मध्य रेल्वे प्रशासनाच्यावतीने दिली आहे.
ग्रॉट रोड, प्रभादेवी, दादर, माटुंगा रोड, माहिम यार्ड, वांद्रे, खार, अंधेरी, जोगेश्वरी आणि वसई-विरार या भागात मागील वर्षी जास्तप्रमाणात पाणी साचण्याचे प्रमाण आहे. येथे पाणी साचल्याने लोकल सेवेला लाल सिग्नल मिळतो. त्यामुळे प्रवाशांना इच्छितस्थळी पोहचण्यास विलंब होतो. त्यामुळे या स्थानकावर रेल्वे प्रशासनाचे विशेष लक्ष ठेऊन येथे मान्सून पूर्वची कामे जोरदार हाती घेतली आहेत. पावसाळ््यात पश्चिम रेल्वे मार्गावरील अनेक स्थानकामध्ये रेल्वे रूळावर पाणी साचून लोकल खोळंबा झाला आहे. त्यामुळे यावर्षी पश्चिम रेल्वे प्रशासनाद्वारे मान्सूनपूर्वची जोरदार तयारी सुरू आहे.
मागील वर्षी ज्या भागात पाणी साचण्याच्या समस्या झाल्या त्या भागात यावर्षी अतिरिक्त सुविधा पुरवून नवीन उपाययोजना राबविण्याचा मानस पश्चिम रेल्वे प्रशासनाने केला आहे. मान्सूनमध्ये लोकल सेवा ठप्प होऊ नये, यासाठी विशेष कामे पश्चिम रेल्वे प्रशासनाद्वारे केली जात आहेत. ही कामे दोन टप्पात केली जाणार आहेत. १० जूनपर्यंत पहिला टप्पा पूर्ण करण्यात येणार आहे. यामध्ये रेल्वे स्थानकातील नाल्याची सफाई करण्यात येत आहे. पाण्याचा उपसा करण्यासाठी पंपाची व्यवस्था केली जाणार आहे. यासह इतर आवश्यकबाबीची पुर्तता यावेळी केली जाणार आहे. भुयारी गटारे आणि नाल्यांची खोली वाढविण्याचे आणि साफसफाईची कामे हाती घेतली जाणार आहेत, अशी माहिती पश्चिम रेल्वे प्रशासनाकडून दिली आहे.