Join us

स्थानकांतील अस्वच्छतेला रेल्वेच जबाबदार!

By ऑनलाइन लोकमत | Published: August 23, 2018 4:26 AM

प्रवाशांनी स्वच्छता पाळायला हवी, असे सांगत रेल्वेचे अधिकारी स्थानक स्वच्छतेची जबाबदारी प्रवाशांवर टाकत असले, तरी या अस्वच्छतेला रेल्वे जबाबदार असल्याचे प्रवाशांचे मत आहे.

देशपातळीवर नुकत्याच झालेल्या रेल्वे स्थानकांच्या स्वच्छता पाहणीत, कल्याण स्थानक सर्वाधिक अस्वच्छतेच्या यादीत वरच्या क्रमांकावर आले. प्रवाशांनी स्वच्छता पाळायला हवी, असे सांगत रेल्वेचे अधिकारी स्थानक स्वच्छतेची जबाबदारी प्रवाशांवर टाकत असले, तरी या अस्वच्छतेला रेल्वे जबाबदार असल्याचे प्रवाशांचे मत आहे. रेल्वे स्थानकांत खाद्यपदार्थांची थाटलेली हॉटेल्स, प्लॅस्टिकबंदीकडे दुर्लक्ष आणि लांब पल्ल्याच्या गाड्यांच्या शौचालयांमुळे होणाऱ्या घाणीला पर्याय शोधायला हवा, अशी त्यांची भूमिका आहे.हार्बर रेल्वे स्थानकांवर स्वच्छतेचा बोजवारा!मुंबई शहराला पर्याय म्हणून शहरांचे शिल्पकार सिडकोने नवी मुंबई शहराची निर्मिती केली. शहराचा सुनियोजित विकास झाल्यानंतर मूलभूत सुविधांसाठी रेल्वे सोबत सामंजस्य करार करून, मानखुर्द-पनवेल या विस्तारित हार्बर रेल्वे मार्गावर तर पनवेल-ठाणे या ट्रान्स हार्बर रेल्वे मार्गावर प्रवाशी वाहतूक सुरू केली. आयटी पार्क, व्यवसाय, औद्योगिक वसाहती, जवाहरलाल नेहरू बंदर आणि प्रस्तावित विमानतळ प्रकल्पामुळे रोजगार संधी उपलब्ध झाल्या आहेत. त्यामुळे दिवसेंदिवस प्रवाशांच्या संख्येत लक्षणीय वाढ झाल्याने रेल्वेच्या उत्पन्नात वाढ होत आहे. वाशी मानखुर्द पुलामुळे तिकीट-पासावर अतिरिक्त अधिभारही वसूल केला जात आहे. भविष्यात हा किती कालावधीसाठी आकारणार आहे, हेही अनभिज्ञच आहे, पण सोईसुविधा पुरविण्यात मात्र दुजाभाव केला जात आहे. पश्चिम, मध्य रेल्वे मार्गावर वापरून रद्दाड लोकल या मार्गावर चालविल्या जातात. त्यांच्या देखभाल-दुरुस्तीकडे दुर्लक्ष केले जाते. अशा लोकलमधून प्रवाशांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागतो. कोंदट हवा आणि अपुºया प्रकाशामुळे जिवाचा कोंडमारा होतो, तर ट्रान्स हार्बर म्हणजे भिकारी आणि गर्दुल्ले यांचा अड्डा बनला आहे. वाशीसारखे बोटावर मोजता येईल, अशी स्थानके सोडली, तर स्वच्छतेचा पूर्ण बोजवारा उडाला आहे. हार्बर आणि ट्रान्स हार्बर मार्गावरील रेल्वे स्थानके सिडकोने नवी मुंबई महानगरपालिकेकडे हस्तांतरित करण्याचा प्रस्ताव प्रलंबित आहे. लांब लचक अशा वाशी रेल्वे खाडी पुलावर आपत्कालीन परिस्थितीत पुलावर समांतर पदपथाचे व्यवस्थापन नाही. दुर्घटना झालीच, तर मोठी जीवितहानी होण्याची शक्यता नाकारता येत नाही. सुस्त रेल्वे प्रशासन आणि लोकप्रतिनिधी आता तरी जागे होऊन रेल्वे प्रवाशांच्या व्यथेची दखल घेऊन योग्य कार्यवाही करतील काय?- मल्हारी घाडगे, नवी मुंबई.कॅन्टीनच्या अस्वच्छतेला आधी आवर घाला!प्रवाशांना खाद्यपदार्थ मिळावेत, असे कारण पुढे करत, रेल्वेने प्रत्येक स्थानकावर कॅन्टीनच्या नावाखाली हॉटेल्स थाटली आहेत. तेथे अन्नपदार्थ साठविले जातात. गॅस पेटवून तेथेच खाद्यपदार्थ बनविले जातात. उरलेले अन्न, खरकटे तसेच टाकून दिले जाते. त्यातून उंदीर, घुशी, झुरळे वाढतात. अन्न कुजून दुर्गंधी पसरते, पण ती कोणी साफ करत नाहीत. उंदीरही मारले जात नाहीत. त्यांचा बंदोबस्त केला जात नाही. अशी कॅन्टीन नवी मुंबईतील स्थानकांत नाहीत, स्थानकांबाहेर आहेत. मुंबई छत्रपती शिवाजी टर्मिनस स्थानकातूनही अशीकॅन्टीन हटविण्यात आली आहेत. त्यामुळे तेथील प्रवाशांचे काही अडलेले नाही. उलट उभे राहण्यास पुरेशी जागा उपलब्ध झाली आहे. स्थानकांतील स्वच्छतागृहेही कायम अस्वच्छ असतात. त्यामुळे दुर्गंधी पसरते. त्यासाठी रेल्वेने कंत्राटे दिली आहेत, तरीही ती अस्वच्छ राहात असल्याबद्दल जाब विचारायला हवा. रेल्वेने काही वर्षांपूर्वी प्लॅस्टिकबंदी केली होती, पण नंतर दबावापोटी ती मागे घेतली. आता राज्याने लागू केलेली बंदी तरी अंमलात आणायला हवी, तरच सांडपाणी अडणे बंद होईल. लांब पल्ल्याच्या गाड्या ज्या स्थानकांत थांबतात. तेथे गाड्यांतील शौचालयांमुळे अस्वच्छता पसरते. ही मानवी विष्ठा डब्यातच नष्ट करण्याची व्यवस्था लवकरात लवकर अंमलातयायला हवी. हे सारे मुद्दे रेल्वेशी संबंधित आहेत. प्रवाशांशी नाही. त्यामुळे स्थानक स्वच्छ राखण्याची जबाबदारी रेल्वेचे अधिकारी आणि कर्मचाºयांवर टाकायला हवी.- अलका कुलकर्णी, डोंबिवली.समन्वय साधून स्वच्छता राखणे आवश्यकमध्य रेल्वेची प्रवासी क्षमता संपलेली असल्याचे रेल्वे अधिकारी सांगतात. यामुळे प्रवाशांना गृहीत धरण्याचे प्रकार रेल्वे प्रशासनाकडून होते. दरवर्षी होणाºया स्थानक स्वच्छता यादी केवळ अव्वल क्रमांक मिळविला की स्थानकात स्वच्छता होते, असे नाही. रोजच्या प्रवासादरम्यान अनेक स्थानकांत कचºयाचे साम्राज्य पसरले आहे. काही रेल्वे स्थानक परिसरात महापालिका हद्दीचा समावेश होतो. यामुळे या परिसरातील स्वच्छता नेमकी कुणी राखायची? हा मुद्दा महत्त्वाचा आहे. हार्बर मार्गावरील रेल्वे स्थानकांसह लोकल फेºयांची स्थिती यापेक्षा बिकट आहे. यामुळे संबंधित सर्व प्रशासनाने समन्वय साधून स्वच्छता राखणे आवश्यक आहे.- निर्मला देशमुख, चिंचपोकळी.रेल्वे अधिकाºयांनी आढावा घेणे गरजेचेरेल्वे स्थानकांवरील अस्वच्छतेला फक्त प्रवाशांना दोषी ठरवू नये. रेल्वे प्रशासनानेही प्रवाशांना चांगल्या सुविधा देण्याची गरज आहे. त्याकरिता रेल्वेतील अधिकारी वर्गाने स्थानकांवरील स्वच्छतेचा आढावा घेतला पाहिजे, जेणेकरून प्रवाशांच्या समस्या ते जाणून घेऊ शकतात. केवळ पोकळ आश्वासने देऊन प्रवाशांना वेठीस धरू नये.- उदय वाघवणकर, जोगेश्वरी.स्वच्छता ही जबाबदारी नव्हे तर, कर्तव्यरेल्वे स्थानकांवरील स्वच्छता राखणे ही जबाबदारी नसून, ते रेल्वे अधिकारी-कर्मचाºयांसह प्रवाशांचे कर्तव्य आहे. यानुसार, रेल्वे स्थानकांवर स्वच्छता राखणे गरजेचे आहे. त्याचबरोबर, स्थानकांवरील खाद्यपदार्थ विक्री करणाºया स्टॉलवरील वाया जाणारे अन्न रेल्वे रुळांवर न टाकता त्याची योग्य विल्हेवाट लावणे गरजेचे आहे.- विनायक चव्हाण, कांजूरमार्ग.स्थानकांवरील शौचालयांमध्ये स्वच्छता हवीरेल्वे स्थानकांवरील बहुतांशी शौचालयांची दुरवस्था झालेली आहे. काही शौचालयांत नळ, शौचकुपे तुटलेल्या अवस्थेत आढळतात. रेल्वे स्थानकांवरील शौचालयाच्या वापरांसाठी पैसे घेण्यात येतात. मात्र, शौचालयांच्या स्वच्छतेबाबत रेल्वे प्रशासन ठेकेदारांवर कोणतीच कारवाई करताना दिसत नाही. यामुळे स्वच्छ रेल्वे स्थानकांसह रेल्वे स्थानकांवरील शौचालयामध्ये स्वच्छता राखणे आवश्यक आहे.- श्रद्धा गायकवाड, मालाडदर आठवड्याला स्वच्छतेचे आॅडिट हवेमुंबईतील वेगवान प्रवासाचे साधन म्हणून रेल्वेकडे बघितले जाते. त्यामुळे मोठ्या संख्येने नोकरदार वर्ग प्रवासासाठी उपनगरीय रेल्वेसेवेचा वापर करतात, तसेच रेल्वेला मुंबईतून मोठ्या प्रमाणातून या प्रवाशांच्या माध्यमातून महसूल मिळतो, पण त्या तुलनेत प्रवाशांना सुविधा मिळत नाही, तसेच अनेक स्थानकांवर स्वच्छतेचा बोजवारा उडालेला असल्याचे दिसून येते. या उपाय म्हणून रेल्वेने स्थानकांतील स्वच्छतेची कामे प्राधान्याने केली पाहिजेत, तसेच या सर्व कामाचे दर आठवड्याला स्वच्छतेचे आॅडिट करावे. त्यामुळे स्थानके स्वच्छ होण्यास मदत होईल, तसेच कोणत्या उपाययोजना करणे गरजेचे आहे, हे लक्षात येण्यास मदत होईल.- अमेय गिरधर, नालासोपारा.

टॅग्स :रेल्वेपश्चिम रेल्वेमध्य रेल्वेहार्बर रेल्वे