मुंबई : रेल्वेचे नियम मोडणाऱ्यांवर मध्य रेल्वेकडून कठोर कारवाईचा बडगा उचलण्यात येत आहे. मागील अकरा महिन्यांत रेल्वेचे नियम मोडणाऱ्या ४४ हजार ६९२ जणांवर कारवाई करण्यात आल्याची माहिती मध्य रेल्वे आरपीएफकडून (रेल्वे सुरक्षा दल) देण्यात आली. यात आरक्षित डब्यातील घुसखोरी, फेरीवाल्यांचा मोठा त्रास प्रवाशांना सहन करावा लागत असून त्याविरोधात सर्वात जास्त कारवाई झाली आहे. रेल्वेचे नियम मोडणाऱ्यांवर आरपीएफकडून विविध कलमांखाली कारवाई केली जाते. ही कारवाई केल्यानंतरही पुन्हा जैसे थेच परिस्थिती दिसते. २0१५ मध्ये आरपीएफकडून मध्य रेल्वेवर नियम मोडणाऱ्यांविरोधात मोठी कारवाई करण्यात आली आहे. यात ४४ हजार ६९२ जण आरपीएफच्या जाळ्यात अडकले आहेत. आरपीएफकडून मागील पंधरा दिवसांत रेल्वे रूळ ओलांडून नियम मोडणाऱ्या प्रवाशांविरोधात तर धडक मोहीमही हाती घेतली आहे. या मोहिमेमुळे रेल्वे रूळ ओलांडणाऱ्यांचे प्रमाण कमी झाल्याचा दावा मध्य रेल्वे प्रशासन करत आहे. मागील अकरा महिन्यांत रूळ ओलांडणाऱ्यांविरोधात केलेल्या कारवाईत ३ हजार ६0६ प्रवाशांना पकडण्यात आल्याची माहिती मध्य रेल्वे आरपीएफकडून देण्यात आली. या कारवाईबरोबरच सर्वाधिक कारवाई आरक्षित डब्यांमध्ये होणारी घुसखोरी आणि अनधिकृत फेरीवाल्यांविरोधात करण्यात आली आहे. लोकल तसेच मेल-एक्स्प्रेस गाड्यांमधील आरक्षित डब्यात घुसखोरी करणाऱ्या १६ हजार ३४ जणांवर कारवाई करण्यात आली आहे. तर त्यापाठोपाठ १४ हजार ५१९ अनधिकृत फेरीवाल्यांवरही कारवाई करण्यात आल्याचे सांगण्यात आले. मध्य रेल्वेवरील सीएसटी, मस्जिद स्थानक, दादर, कुर्ला, घाटकोपर, भांडुप, ठाणे, कळवा, मुंब्रा, दिवा, डोंबिवली, कल्याण तसेच वडाळा, शिवडी, मानखुर्द, गोवंडी, चेंबूर या हार्बरवरील स्थानकांवर सर्वात जास्त कारवाई करण्यात आली आहे.पश्चिम रेल्वेवर अकरा महिन्यांत २१ लाख विनातिकीट प्रवासीपश्चिम रेल्वे मार्गावर अकरा महिन्यांत २१ लाख ८३ हजार विनातिकीट प्रवासी पकडण्यात आले. त्यांच्यावर करण्यात आलेल्या कारवाईतून ९0 कोटी ४३ लाख रुपये वसूल करण्यात आले असल्याची माहिती पश्चिम रेल्वेकडून देण्यात आली. नोव्हेंबर महिन्यातच करण्यात आलेल्या कारवाईत २ लाख ६७ हजार फुकटे प्रवासी पकडले गेले असून १२ कोटी रुपये दंड वसूल झाला आहे.
४४,६९२ जणांनी मोडले रेल्वेचे नियम
By admin | Published: December 25, 2015 2:47 AM