मुंबई : अंधेरी पूल दुर्घटनेनंतर रेल्वे सुरक्षा आयोगाने गुरुवारी प्रत्यक्ष चौकशीला सुरुवात केली. चौकशीदरम्यान प्रवाशांकडून हरकती व सूचना नोंदवण्याचे आवाहन आयोगाने केले होते. तथापि पुलांच्या सुरक्षेबाबत सूचना देताना त्या मराठी भाषेत न देता हिंदी किंवा इंग्रजी भाषेत देण्याच्या सूचना रेल्वे सुरक्षा आयोगाने केल्या. यामुळे मुंबईकरांच्या जिवाशी खेळ करणाऱ्या रेल्वे प्रशासनाला मुंबईकरांच्या मराठी भाषेत उपाययोजना सुचविण्यावर आक्षेप का, असा सवाल चौकशीस उपस्थित असलेले सेंट झेविअर्स महाविद्यालयाचे प्राध्यापक अवकाश जाधव यांनी उपस्थित केला.अंधेरी पूल दुर्घटनेत ५ प्रवासी जखमी झाले असून यातील तिघे अत्यवस्थ आहेत. दुर्घटनेच्या चौकशीसाठी रेल्वे सुरक्षा आयोगाचे अध्यक्ष सुशील चंद्रा यांच्यासह पश्चिम रेल्वेतील अधिकाºयांनी बुधवारी दुपारी ३ वाजता घटनास्थळी भेट दिली. यानंतर गुरुवारपासून मुंबई सेंट्रल येथील विभागीय रेल्वे व्यवस्थापकांच्या कार्यालयात प्रत्यक्ष चौकशीला सुरुवात झाली. खुल्या चौकशीत रेल्वे अधिकारी वगळता सुमारे १५ प्रवाशांनी सहभाग घेतला. या वेळी सेंट झेविअर्स महाविद्यालयाचे प्राध्यापक अवकाश जाधव सहा विद्यार्थ्यांसह उपस्थित होते. विद्यार्थ्यांनी ‘मराठी’ भाषेत उपाययोजना सांगण्यास सुरुवात केली. या वेळी आयोगातील उपस्थित अधिकाºयांनी मराठीत बोलू नका, हिंदी किंवा इंग्रजी भाषेत सांगा, अशा सूचना प्राध्यापक जाधव आणि विद्यार्थ्यांना केल्या.प्राध्यापक जाधव यांनी मुंबई रेल्वे स्थानकात सुरक्षा, वैद्यकीय सुविधा देण्याची गरज असल्याचा उल्लेख आयोगाला दिलेल्या पत्रकात केला आहे. त्याचबरोबर मुंबई विभागातून रेल्वेला वर्षाला ३० हजार कोटींचा आर्थिक महसूल मिळतो. मात्र संपूर्ण महाराष्ट्रासाठी केवळ ६ हजार कोटीच खर्च केले जात असल्याचेही त्यांनी पत्रातून आयोगाच्या निदर्शनास आणून दिले.पुलाचा सांगाडा मुंबई सेंट्रलमध्येअंधेरी येथील गोखले पादचारी पुलाचा कोसळलेला सांगाडा गुरुवारी दुपारी४ वाजण्याच्या सुमारास मुंबई सेंट्रल येथे आणण्यात आला. यात पादचारी पुलाचे १९ ब्रॅकेट अँगल, पुलाचा पृष्ठभाग आणि लोखंडी खांब यांचा समावेश आहे. रेल्वे सुरक्षा आयोगाकडून या भागांचीही पाहणी करण्यात येणार असल्याची माहिती पश्चिम रेल्वेने दिली.
रेल्वे सुरक्षा आयोगाला मराठीचे वावडे; माहिती हिंदी, इंग्रजीतून देण्याच्या सूचना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 06, 2018 12:46 AM