मुंबई : अंधेरी ते विलेपार्ले स्थानकांदरम्यान लोकल रुळावरून घसरल्याची घटना नुकतीच घडली. या घटनेची चौकशी रेल्वे सुरक्षा आयुक्तांकडून सुरू करण्यात आल्यानंतर चौकशीच्या पहिल्याच दिवशी प्रशासनाच्या कामकाजावर ताशेरे ओढण्यात आले. रेल्वेच्या अभियांत्रिकी विभागापासून रेल्वे कारखान्यातील कर्मचाऱ्यांचा चौकशीत समावेश होता. अंधेरी ते विलेपार्लेदरम्यान चर्चगेटला जाणाऱ्या जलद लोकलचे सात डबे रुळावरून घसरले. यात सहा प्रवासी जखमी झाले. तब्बल २२ तासांनंतर पश्चिम रेल्वे सुरळीत झाली. या घटनेची रेल्वे सुरक्षा आयुक्तांकडून चौकशी करण्याचा निर्णय घेण्यात आला आणि त्यानुसार १८ सप्टेंबर आणि २२ सप्टेंबर रोजी चौकशी होईल, अशी माहिती रेल्वेकडून देण्यात आली. चौकशीच्या पहिल्या दिवशी रेल्वे अधिकारी व कर्मचारी यांची चौकशी करण्यात आली. यात रेल्वे व्यवस्थापक, अभियांत्रिकी अधिकारी, ओव्हरहेड वायर कर्मचारी, रेल्वे कारखान्यातील कर्मचाऱ्यांचा यात समावेश होता. ही चौकशी करताना देखभाल व दुरुस्तीबरोबरच डबे हटवण्यासाठी लागलेला उशीर याबाबत रेल्वे सुरक्षा आयुक्त सुशील चंद्र यांनी नाराजी व्यक्त केली. त्याचप्रमाणे रुळावरून घसरलेल्या डब्यांपैकी एका डब्याचे चाक तुटले होते. याची माहिती रेल्वे सुरक्षा आयुक्तांनी घेतली असता, ते चाक २६ जून २0१५ रोजी बसवण्यात आल्याची माहिती देण्यात आली. तसेच चाकाची उच्च क्षमता चाचणी २९ जून रोजी झाली होती. दर सहा महिन्यांनी ही चाचणी होतानाच चाकात कोणताही बिघाड नसल्याचे समोर आले. त्यामुळे अन्य कारणांचा शोध रेल्वे सुरक्षा आयुक्तांकडून घेण्यात येत आहे. वरिष्ठ विभागीय सुरक्षा अधिकारी आजारीअपघात झाल्यानंतर रेल्वे डबे, अभियांत्रिकी, ओव्हरहेड वायर आदी विभागांतील अधिकाऱ्यांची समिती त्याच दिवशी घटनास्थळी जाऊन पाहणी करते. या समितीचा अहवाल वरिष्ठ विभागीय सुरक्षा अधिकाऱ्यांच्या अधिकाराखाली तयार होतो. अपघात झाल्यानंतर विविध विभागांतील अधिकाऱ्यांकडून पाहणी करण्यात आली. मात्र वरिष्ठ विभागीय सुरक्षा अधिकाऱ्यांची प्रकृती अचानक बिघडल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आणि अहवाल तयार झालाच नसल्याचे रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्याकडून सांगण्यात आले. प्रत्येक महिला डब्यात दोन ते पाच सीसीटीव्हीपश्चिम रेल्वेच्या लोकलमधील महिला डब्यात सीसीटीव्ही बसवण्यात आले असतानाच आता मध्य रेल्वेवरील लोकलच्या महिला डब्यातही सीसीटीव्ही बसवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यासाठी १० दिवसांत सीसीटीव्ही कंपन्यांना प्रस्ताव सादर करण्यास सांगण्यात आल्याचे मध्य रेल्वेकडून सांगण्यात आले. सीसीटीव्ही कंपन्यांना आकर्षित करण्यासाठी दोन वर्षांपर्यंत महिला डब्यात आणि डब्याबाहेर त्या कंपनीची जाहिरात करण्याचा अधिकार देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. गेल्या काही वर्षांत महिला डब्यातून प्रवास करणाऱ्या महिला प्रवाशांवर हल्ले होत आहेत. त्यामुळे महिला प्रवाशांचा प्रवास असुरक्षित झाला असून, महिला प्रवाशांच्या सुरक्षेबाबत निर्णय घेण्याची मागणी होऊ लागली. या मागणीचा विचार करून पश्चिम रेल्वेने महिला डब्यात सीसीटीव्ही बसवण्याचा निर्णय घेतला. मध्य रेल्वेकडून मात्र महिला डब्यात सीसीटीव्ही बसवण्याबाबत अंतिम निर्णय घेण्यात आला नव्हता. अखेर हा निर्णय घेण्यात आला असून, योजनेनुसार प्रत्येक डब्यात दोन ते पाच सीसीटीव्ही बसवण्यात येतील, तर ३0 दिवसांपर्यंतचा चित्रीकरणाचा साठा यात होऊ शकतो, अशी माहिती मध्य रेल्वेकडून देण्यात आली.
रेल्वे सुरक्षा आयुक्तांकडून ‘परे’ प्रशासनावर ताशेरे
By admin | Published: September 19, 2015 1:23 AM