तिकीट दलालांच्या तक्रारीसाठी रेल्वे सुरक्षा बलाची हेल्पलाइन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 17, 2019 06:22 AM2019-04-17T06:22:40+5:302019-04-17T06:22:44+5:30
मध्य रेल्वे मार्गावर तिकीट काढण्यासाठी काही प्रवाशांना दलालांच्या कटकटीला सामोरे जावे लागत असल्याचे समोर आले आहे.
मुंबई : मध्य रेल्वे मार्गावर तिकीट काढण्यासाठी काही प्रवाशांना दलालांच्या कटकटीला सामोरे जावे लागत असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे मुंबई विभागाच्या रेल्वे सुरक्षा बलाच्या वतीने अशा दलालांची तक्रार करण्यासाठी हेल्पलाइन क्रमांक उपलब्ध करून देण्यात आला आहे.
मध्य रेल्वे मार्गावरून लोकलचे अथवा मेल, एक्स्प्रेसचे तिकीट काढण्यासाठी खूप मोठी रांग असते. आता उन्हाळ्याच्या सुट्ट्या सुरू झाल्यामुळे तिकीट मिळणे कठीण होते. त्यामुळे प्रवाशांना तिकिटाची विक्री करण्यासाठी दलाल तिकीटघरासमोर असतात. इतर पर्याय उपलब्ध नसल्यामुळे प्रवाशांकडून या दलालांचा आधार घेत तिकीट घेण्ययात येते.
मात्र, प्रवाशांची हीच गरज लक्षात घेता दलालांमार्फत जादा दरात तिकीट दिले जाते व प्रवाशांची लूट करण्यात येते. अशा प्रकारे प्रवाशांची फसवणूक होऊ नये, यासाठी रेल्वे सुरक्षा बलाने हेल्पलाइन क्रमांक सुरू केला आहे. प्रवासी ९९८७६४५३०७ या हेल्पलाइन क्रमांकावर तक्रार दाखल करू शकतात. यासह दलालाचा फोटो काढून व्हॉट्सअॅपद्वारेही पाठवू शकतात, असे मध्य रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.