मुंबई : रेल्वे सुरक्षा बलाने प्रत्येक रेल्वे परिसरात ‘आॅपरेशन नंबर प्लेट’ सुरू केले होते. यामध्ये एक किंवा त्यापेक्षा अधिक दिवसांच्या कालावधीमध्ये रेल्वे परिसरात पार्किंग केलेल्या गाड्यांवर कारवाई करण्यात आली.भारतीय रेल्वे मार्गावर रेल्वे सुरक्षा बलाकडून स्वातंत्र्य दिनाच्या पार्श्वभूमीवर ९ ते ११ आॅगस्ट या कालावधीत रेल्वे परिसरातील पार्किंग, नो पार्किंग क्षेत्रात अनेक कालावधीपासून पार्किंग केलेल्या वाहनांची ओळख पटविण्यात आली. यासाठी रेल्वे सुरक्षा बलाने ‘आॅपरेशन नंबर प्लेट’ मोहीम राबविली. याद्वारे रेल्वे परिसरातून अनोळखी वाहने हटविण्यात आली.भारतीय रेल्वेमधील ४६६ रेल्वे स्थानकांवर ‘आॅपरेशन नंबर प्लेट’ मोहीम राबविण्यात आली. रेल्वे परिसरात ३ हजार ९४३ वाहने अनधिकृत पार्किंग केली होती. ही वाहने पाच दिवसांपासून अधिक काळापासून पार्क केली होती.या गाड्यांची ओळख पटविण्याचे काम सुरू आहे. एका दिवसापासून ते पाच दिवसांपर्यंत पार्किंग केलेल्या वाहनांची संख्या २ हजार ३४ आहे. या गाड्या ‘नो पार्किंग’ क्षेत्रात पार्क केल्या होत्या. यासह ५४९ वाहनांना रेल्वे परिसरातून हटविण्यात आले असून पोलीस ठाण्यात जमा केल्या आहेत. अनधिकृत वाहन पार्किंग केलेल्या प्रवाशांकडून ५९ हजारांचा दंड वसूल केला आहे. मोहिमेच्या अंतर्गत रेल्वे परिसरात ४ वाहने चोरी करण्यात आल्याचे उघडकीस आले. या वाहनांबाबत पोलीस ठाण्यात चोरीच्या घटनेची नोंद आहे. मुंबई विभागातील मध्य रेल्वेचे प्रधान मुख्य सुरक्षा आयुक्त अतुल पाठक, विभागीय वरिष्ठ सुरक्षा आयुक्त अशरफ के. के. यांच्या मार्गदर्शनाखाली ‘आॅपरेशन नंबर प्लेट’ मोहीम राबविण्यातआली.भायखळा, कुर्ला येथे सर्वाधिक बेकायदा वाहनेमध्य रेल्वे मार्गावरील सीएसएमटी, भायखळा, लोकमान्य टिळक टर्मिनस, कुर्ला, ठाणे, डोंबिवली, कल्याण, बदलापूर, अंबरनाथ, मानखुर्द या स्थानकांवर जास्त प्रमाणात वाहने बेकायदा पार्क केल्याचे आढळून आले. मध्य रेल्वे मार्गावर ११४ वाहने एक ते पाच दिवसांपासून नो पार्किंग क्षेत्रात पार्क केली होती, तर ४० वाहने पाच दिवसांपेक्षा अधिक कालावधीपासून नो पार्किंग क्षेत्रात पार्क केल्याचे आढळून आले. या वाहनांना हटवून वाहनाच्या मालकांकडून दंडाची रक्कम वसूल करण्यात आली. पोलिसांनी पनवेल, रोहा, भायखळा आणि डोंबिवली या स्थानकांवरील १६ वाहनांना हटविले.
रेल्वे सुरक्षा बलाचे ‘ऑपरेशन नंबर प्लेट’
By ऑनलाइन लोकमत | Published: August 14, 2019 2:49 AM