रेल्वेने मुंबईकरांना गृहीत धरणे बंद करावे!
By ऑनलाइन लोकमत | Published: July 19, 2018 02:25 AM2018-07-19T02:25:50+5:302018-07-19T02:25:58+5:30
देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबई शहरातील प्रवाशांचे मुख्य साधन असलेली रेल्वे सध्या अकार्यक्षमतेच्या उंबरठ्यावर आहे.
देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबई शहरातील प्रवाशांचे मुख्य साधन असलेली रेल्वे सध्या अकार्यक्षमतेच्या उंबरठ्यावर आहे. दोन ते तीन तास मुसळधार पावसात रेल्वेचे वेळापत्रक कोलमडते. यामुळे रेल्वेचे अधिकारी नेमके काय काम करतात, असा प्रश्न उपस्थित होतो. मुंबईकरांकडून मिळणाऱ्या रोजच्या कोट्यवधी उत्पन्नामुळे रेल्वे प्रशासनाने मुंबईकरांना गृहीत धरण्याचा प्रकार सुरू केला असल्याचा सूर प्रवाशांनी पाठविलेल्या प्रतिक्रियांमध्ये उमटत आहे. या प्रतिक्रियांचा ‘प्रवासी कट्ट्या’च्या निमित्ताने घेतलेला धांडोळा.
कायमस्वरूपी उपाययोजनांसाठी एकत्रित कामाची गरज
पश्चिम रेल्वेवरील वसई-विरार भागात पहिल्यांदा एवढ्या मोठ्या प्रमाणात पाणी भरले होते. मुळात शहर विकासाच्या भौगोलिक रचनेचा फटका नालासोपारा स्थानकाला बसल्याचे पाहणीतून दिसून आले. शहरातील अनधिकृत बांधकामांच्या ड्रेनेज लाइन सुस्थितीत नसल्याने पाणी तुंबण्याच्या घटना घडतात. पावसाचे पाणी रोखण्यासाठी तात्पुरत्या स्वरूपाच्या उपाययोजना पश्चिम रेल्वेने केल्या आहेत. मात्र कायमस्वरूपी योजनांसाठी रेल्वे आणि संबंधित प्रशासकीय यंत्रणेने एकत्र येऊन काम करणे गरजेचे आहे.
- ए.के. गुप्ता, महाव्यवस्थापक, पश्चिम रेल्वे
रेल्वे आणि अन्य यंत्रणा
दोषी - रेल्वे सुरक्षा आयोग
अंधेरी पूल दुर्घटनेच्या चौकशीचा प्राथमिक अहवाल रेल्वे सुरक्षा आयोगाकडून आज रेल्वे प्रशासनाला देण्यात आला. अहवालात अंधेरी पूल दुर्घटनेचा ठपका रेल्वे आणि यंत्रणेवर ठेवण्यात आला आहे. तसेच पुलाच्या उभारणीनंतर पादचारी पुलाचा भाग जोडण्यात आला. यामुळे या अतिरिक्त भाराचा मूळ पूल उभारताना विचार करण्यात आला नव्हता, असा निष्कर्ष रेल्वे सुरक्षा आयोगाने काढला आहे. दरम्यान, हा प्राथमिक अहवाल असल्याचे रेल्वे सुरक्षा आयोगाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.
प्रवासी रेल्वेकडून सुविधांची अपेक्षा करतात - उच्च न्यायालय
रेल्वेच्या व्यवस्थापनावर न्यायालयानेही ताशेरे ओढले आहेत. दरवर्षी रेल्वे नालेसफाई झाल्याचा दावा करते; मात्र प्रत्यक्षात पावसात परिस्थिती जैसे थे असते. प्रवाशांच्या सुविधेसाठी रेल्वे प्रशासनाकडून प्रायोगिक तत्त्वावर कोणत्याच उपाययोजना राबविण्यात येत नाहीत. दरवर्षी पावसामुळे रेल्वे रूळ पाण्याखाली जाणार असतील तर विमानतळाप्रमाणे रेल्वेचेदेखील खासगीकरण करावे, अशा शब्दांत उच्च न्यायालयाने रेल्वेला फटकारले. रेल्वे रुळांची देखभाल, फलाटांची देखभाल, स्थानकांवरील स्वच्छता यांसारख्या बाबी रेल्वेला करणे शक्य नसेल, तर त्यांनी याचे खासगीकरण करण्याचा गांभीर्याने विचार करावा. प्रवासी तुमच्याकडून याच सुविधांची अपेक्षा करतात, असे न्यायालयाने स्पष्ट केले आहे.
>गृहीत धरण्याऐवजी तोडगा काढा
देशातील सर्वांत मोठ्या प्रवासी वाहतूक करणाºया मुंबई उपनगरीय रेल्वेची कार्यक्षमता केव्हाच संपुष्टात आली आहे. याचा प्रत्यय आपण काही वर्षांमध्ये पाहत आहोत. ८ व ९ जुलैच्या पावसाने २६ जुलैच्या पावसाच्या आठवणी ताज्या केल्या. या वेळी वसई-विरारमधील रेल्वे दोन दिवस बंद होती. मुंबईतील रेल्वे स्थानकांवरदेखील हीच
परिस्थिती होती. मुळात मुंबई रेल्वेला पाऊस नवीन नाही. पण भूतकाळातील अनुभवातून रेल्वे प्रशासन कोणताच धडा घेत नसल्याने त्याचा फटका सामान्य प्रवाशांना बसतो. मुसळधार पाऊस आला की सर्वांत आधी रेल्वे सेवा ठप्प होते. रेल्वे प्रशासनाकडून प्रवाशांना गृहीत धरण्याचा प्रकार सुरू असून रेल्वेने हे त्वरित बंद करणे गरजेचे आहे. यासाठी महापालिकेसमवेत रेल्वे प्रशासनाने कायमस्वरूपी तोडगा काढणे गरजेचे आहे.
- प्रमोद पावसकर, विरार
>रेल्वे अधिकाºयांना लोकल
प्रवास सक्तीचा करावा
मुंबईची लाइफलाइन समजल्या जाणाºया रेल्वे सेवेला अद्ययावत करण्याची गरज आहे. यामध्ये कर्मचारी वर्गास शिस्त लावण्यापासून ते लोकल नियोजनापर्यंतचे अनेक विषय आहेत. ज्यावर अजूनपर्यंत ठोस भूमिका घेण्यात आलेली नाही. रेल्वेमंत्री यांनी स्वत: रेल्वेने प्रवास करून लोकांच्या समस्या जाणून घेऊन त्यावर तत्काळ उपाययोजना करायला हवी. त्याचबरोबर मध्य रेल्वेमधील महाव्यवस्थापक यांच्यासह विभागीय रेल्वे व्यवस्थापक आणि अन्य उच्च पदस्थ अधिकारी यांना सामान्य नागरिकांप्रमाणे लोकलमधून प्रवास करण्याची सक्ती करण्यात यावी.
- उदय वाघवणकर, जोगेश्वरी
>प्रशासनाकडे इच्छाशक्तीची कमतरता
मुंबईतील लोकलची सद्य:स्थिती फारच वाईट आहे. सुरक्षेच्या अभावामुळे अपघातांची संख्या वाढतच आहे. पावसाळ्याचे नियोजन नीट न करता आल्यामुळे अतिवृष्टीच्या काळात रेल्वेसेवा ठप्प होते. प्रशासनाची इच्छाशक्ती असेल, तर योग्य नियोजन करून ते मुंबईतील रेल्वेसेवा ‘रुळावर’ आणू शकतात. मात्र, त्यांच्यात ती दिसून येत नाही. रेल्वेमार्गांची उंची वाढविल्यास पावसाळ्यात ट्रॅक पाण्याखाली जाण्याचा धोका टळू शकेल. रेल्वेलगत असलेल्या नाल्यांची साफसफाई वेळेवर व्हायला हवी. रेल्वेलगतच्या अनधिकृत झोपड्या हटवून त्या जागी अप-डाऊन असा एक-एक ट्रॅक वाढविल्यास प्रवाशांची गर्दीतून, जीवघेण्या प्रवासातून सुटका होईल. प्रवाशांनीसुद्धा खाद्यपदार्थांचे कागद सर्वत्र न फेकता प्लॅटफॉर्मवर ठेवलेल्या कचºयाच्या डब्यातच टाकून प्रशासनास सहकार्य करायला हवे.
- जयेश उमेश शेरेकर, घाटकोपर
>न्यायालयाच्या सूचनेवर त्वरित कार्यवाही करा
गेल्या आठवड्यात पडलेल्या मुसळधार पावसामुळे वसई भागात मोठ्या प्रमाणात पाणी साठले. त्यामुळे येथील रेल्वेसेवा ठप्प झाली. त्यामुळे या भागात रेल्वे ट्रॅकची उंची वाढविणे गरजेचे आहे. याबाबत न्यायालयाने रेल्वे प्रशासनाला सूचना केल्या आहेत. न्यायालयाच्या या सूचनेनुसार त्वरित कार्यवाही करणे गरजेचे आहे.
- अमेय गिरधर, नालासोपारा
संकलन : महेश चेमटे