मुंबई : आषाढ महिन्याच्या उत्तरार्धात नागरिकांना गटारीचे वेध लागतात. मांसाहारावर ताव मारण्याचा बेत आखले जातात. याच धर्तीवर मध्य रेल्वेच्या कर्मचा-याने ‘विनातिकीट बकरी’ लिलावातून २ हजार पाचशे रुपयांमध्ये विकत घेत गटारीची तयारी केली. बकरी खरेदी करणा-याचे नाव अब्दुल रेहमान असे असून तो पार्सल विभागात कार्यरत आहे.मध्य रेल्वेवर मंगळवारी सायंकाळी ४.३० वाजण्याच्या सुमारास एक प्रवासी बकरीसोबत मशीद स्थानकात प्रवेश करताच तिकीट तपासणी करणा-या अधिका-याने संबंधिताकडे तिकिटांची मागणी केली. प्रवाशाने त्याचे तिकीट टीसीला दाखवले मात्र बकरीचे तिकीट नसल्यामुळे तपासणी अधिका-यांकडे बकरी सोपवून प्रवाशाने पळ काढल्याचे रेल्वे अधिका-यांनी सांगितले. गुरुवारी बकरीची लिलाव प्रक्रिया पार पडली. अब्दुल रहेमानने ती विकत घेतली. याबाबत मध्य रेल्वेने बकरीचा २ हजार ५०० रुपयांत लिलाव झाल्याचे सांगत अन्य तपशील देण्यास नकार दिला.नियम काय सांगतो?रेल्वे प्रवासात पाळीव प्राण्यांची ने-आण करण्यासाठी विशिष्ट नियम आहेत. मेल-एक्स्प्रेस प्रवासात श्वानांसाठी स्वतंत्र व्यवस्था असते. पण लोकल मार्गावर मात्र पाळीव प्राणी नेण्यास बंदी आहे. या प्रकरणात प्रवाशाने बकरी टीसीच्या हाती सोपवल्यामुळे टीसीने बकरी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथील पार्सल विभागाकडे दिली.
रेल्वे कर्मचाऱ्याची गटारी जोरात!; विनातिकीट बकरीचा २,५०० रुपयांत लिलाव
By ऑनलाइन लोकमत | Published: August 03, 2018 2:15 AM