मनोहर कुंभेजकर
मुंबई : महाराष्ट्रातील रेल्वे स्थानकातील दिव्यांगांच्या सुविधेसाठी पहिल्या ब्रेल सुविधा असलेल्या रेल्वे स्थानकाचा मान बोरीवली रेल्वे स्थानकाला मिळाला आहे. त्यामुळे ‘मुंबईतील सर्वांत जास्त वर्दळीचे स्थानक’ असे बिरुद मिरविणाऱ्या या स्थानकाच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा खोवला गेला आहे.येथे तिकीट काउंटरवर माहिती पुस्तिका उपलब्ध करण्यात आली असून, त्यावर आपत्कालीन परिस्थितीत मदत येऊ शकेल, असा आणीबाणी क्रमांक देण्यात आला आहे. यामुळे दिव्यांगजनांच्या समस्या सुटण्यास मदत होईल. त्यांना सहप्रवाशांवर अवलंबून राहण्याची गरज भासणार नाही. आज भारतात, म्हैसूर हे असे पहिले स्टेशन ठरले असून, येथे दिव्यांग जनासाठी ब्रेल लिपीतून विविध सुविधा पुरविणारे पहिले स्टेशन ठरले आहे.
बोरीवली रेल्वे स्थानकामध्ये ‘जागतिक प्रवासी दिनानिमित्त’ ब्रेल लिपीचा वापर करून, पादचारी पुलावरील रेलिंग, ब्रेल ब्लॉक आणि ग्रे ग्रेनाइट फरशी असलेल्या सुविधेचा शुभारंभ खासदार गोपाळ शेट्टी यांच्या हस्ते करण्यात आला. या वेळी आमदार विलास पोतनीस, भाजपाचे उत्तर मुंबई जिल्हाध्यक्ष विनोद शेलार, आर. यू. सिंह, भाजपाचे मुंबईचे उपाध्यक्ष हेमेंद्र मेहता उपस्थित होते. गोपाळ शेट्टी म्हणाले, दिव्यांग जनांच्या आयुष्यात बदल घडवून आणण्यासाठी बोरीवली स्थानकामध्ये ब्रेल लिपीच्या वापराचा उपक्रम राबविला जात आहे. पंतप्रधानांनी सुचविल्यानुसार, देशातील विविध रेल्वे स्थानकांमध्ये पादचारी पुलावरील रेलिंग, ब्रेल ब्लॉक आणि ग्रेनाइट फरशी सुविधा पुरविण्यात आल्या. दिव्यांग जनांचा प्रवास सुखाचा व्हावा, यासाठी ब्रेल लिपीमधील मार्गदर्शन पुस्तिकाही तिकीट खिडक्यांवर उपलब्ध करण्यात आली आहे.२०११च्या लोकसंख्येनुसार, जगभरात ३९ दशलक्ष दृष्टिहीन असून, भारतात १२ दशलक्ष आहेत. त्यामुळे जगातील १/३ दृष्टिहीन लोकसंख्या भारतात आहे. १५.७ दशलक्ष नागरिक १५ ते ५९ या वयोगटांतील आहेत.