रेल्वे स्टेशन्सना विकासाचे अमृत; स्मार्ट स्थानकांत ‘अशा’ मिळतील सुविधा
By ऑनलाइन लोकमत | Published: August 13, 2023 10:20 AM2023-08-13T10:20:04+5:302023-08-13T10:20:58+5:30
रेल्वे मंत्रालयाने देशातील १३०९ रेल्वेस्थानकांचा कायापालट करण्याचा निर्णय घेतला आहे. ‘अमृत भारत’ योजनेंतर्गत महाराष्ट्रातील ४४ स्थानके स्मार्ट होणार आहेत. लहान मुलांपासून ज्येष्ठ नागरिकांसाठी ही स्थानके यूझर फ्रेंडली असतील.
शिवराज मानसपुरे, मुख्य जनसंपर्क अधिकारी, मध्य रेल्वे
भारतीय रेल्वेने रेल्वेस्थानकांच्या विकासासाठी ‘अमृत भारत स्टेशन योजना’ अलीकडेच सुरू केली आहे. ही योजना दीर्घकालीन मास्टर प्लानिंगवर आधारित आहे, त्यानुसार वेळोवेळी गरजेनुसार अंमलबजावणी केली जाणार आहे. प्रवाशांसाठी किमान अत्यावश्यक सोयीसुविधांच्या पलीकडे सुविधा देणे, हा या योजनेचा मुख्य उद्देश आहे. या स्थानकांमध्ये जागतिक दर्जाच्या सोयीसुविधा असणार आहेत.
रेल्वे मंत्रालयाने देशातील १३०९ रेल्वेस्थानकांचा कायापालट करण्याचा निर्णय घेतला आहे. ‘अमृत भारत’ योजनेंतर्गत टप्प्याटप्प्याने देशातील रेल्वेस्थानकांचा पुनर्विकास केला जाणार आहे. पहिल्या टप्प्यात ५०८ स्थानकांचा पुनर्विकास केला असून, त्याचे भूमिपूजन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते नुकतेच झाले आहे. यामध्ये महाराष्ट्रातील ४४ स्थानकांचा समावेश आहे. अमृत भारत स्टेशन योजना दीर्घकालीन दृष्टिकोनातून तयार करण्यात आली आहे. स्थानकांचा दीर्घकालीन विकास आराखडा तयार करून सुविधांचे नियोजन केले जाणार आहे. दैनंदिन सरासरी प्रवासी संख्या लक्षात घेऊन नियोजन करण्यात येणार आहे. स्थानकाच्या बाह्य रूपासोबत अंतर्गत भागातही सुधारणा केल्या जाणार आहेत.
एक स्टेशन, एक उत्पादन
- ‘एक स्टेशन, एक उत्पादन’ योजनेच्या अंतर्गत प्रत्येक स्टेशनवरील गरजा लक्षात घेऊन विकास करण्यात येईल.
- मोफत वाय-फाय
- स्थानिक उत्पादनांसाठी किऑस्क
- एक्झिक्युटिव्ह लाउंज, व्यवसायासाठी जागेची सुविधा उपलब्ध करणे. लँडस्केपिंगद्वारे सौंदर्यीकरण
- स्टेशनच्या इमारतीत सुविधांचे निर्माण करणे.
- स्टेशनच्या पूर्व व पश्चिम बाजू शहराला जोडणे.
- मल्टिमॉडेल इंटिग्रेशन, दिव्यांग व्यक्तींसाठी सुविधा
अशा सुविधा
- बॅलेस्टलेस ट्रॅकची तरतूद, आवश्यकतेनुसार रुफ प्लाझाची व्यवस्था
- प्रतीक्षालय, शौचालये, आवश्यकतेनुसार लिफ्ट/एस्कलेटरची सुविधा
- स्वच्छतेला प्राधान्य