रेल्वे स्थानके होणार ‘रंगीबेरंगी’

By Admin | Published: July 25, 2016 04:38 AM2016-07-25T04:38:23+5:302016-07-25T04:38:23+5:30

पान खाऊन थुंकल्यामुळे स्थानकांवरील भिंतींचे बदललेले रंग, त्यामुळे पसरलेली अस्वच्छता आणि कोणतेही आकर्षण नसलेल्या स्थानकांचे चित्र लवकरच पालटणार आहे

Railway stations to be 'colorful' | रेल्वे स्थानके होणार ‘रंगीबेरंगी’

रेल्वे स्थानके होणार ‘रंगीबेरंगी’

googlenewsNext

मुंबई : पान खाऊन थुंकल्यामुळे स्थानकांवरील भिंतींचे बदललेले रंग, त्यामुळे पसरलेली अस्वच्छता आणि कोणतेही आकर्षण नसलेल्या स्थानकांचे चित्र लवकरच पालटणार आहे. मुंबई उपनगरीय मार्गांवरील ३६ स्थानके ‘रंगीबेरंगी’ करण्याचा निर्णय घेण्यात आला असून, भिंती, पायऱ्या, छत हे विविध रंगांनी रंगविण्यात येणार आहेत. यासाठी एका सामाजिक संस्थेची मदत घेतानाच कला व वास्तुकला महाविद्यालयांच्या विद्यार्थ्यांकडून हे काम केले जाईल. आॅक्टोबर महिन्यात हे काम केले जाईल.
मध्य आणि पश्चिम रेल्वेच्या उपनगरीय लोकल स्थानकांचा पसारा खूप मोठा आहे. स्थानकांतून प्रवास करताना प्रवाशांकडून स्वच्छतेचे नियम पाळले जात नाहीत. यात प्रवाशांकडून थुंकून स्थानकांत अस्वच्छता केली जाते. त्यामुळे भिंतींचाही रंग बदलतो. एकूणच आकर्षक स्थानके करतानाच सामाजिक संदेशही देण्यासाठी म्हणून स्थानकांतील पादचारी पूल, त्यांच्या पायऱ्या, तिकीट खिडक्या, स्थानकांतील भिंती विविध रंगांनी रंगविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
मध्य रेल्वेवरील १५ तर पश्चिम रेल्वेवरील २१ स्थानके रंगीबेरंगी केली जाणार आहेत. यासाठी रेल्वे स्थानकांजवळच असणाऱ्या कला व वास्तुरचनाकार महाविद्यालयांची मदत घेतली जाणार आहे. याआधी बोरीवली व खार स्थानकांतही रंगरंगोटी करून त्यातून सामाजिक संदेश देण्यात आला आणि हा बदल प्रवाशांना आवडला. त्यामुळे रेल्वेने फर्स्ट अ‍ॅण्ड मेकिंग ए डिफ्रन्स या स्वयंसेवी संस्थेमार्फत स्थानके रंगवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी जवळपास १ कोटी ८0 लाखांचा खर्च अपेक्षित आहे. हे काम आॅक्टोबर महिन्याच्या सुरुवातीच्या आठवड्यात केले जाईल. छोट्या स्थानकांच्या कामांसाठी १00 तर मोठ्या स्थानकांच्या कामांसाठी १५0 स्वयंसेवकांची मदत यासाठी लागणार आहे. 

पुढील स्थानके होणार रंगीबेरंगी
मध्य रेल्वे- मशीद बंदर, सॅण्डहर्स्ट रोड, चिंचपोकळी, करी रोड, परेल, माटुंगा, सायन, कुर्ला, घाटकोपर, विक्रोळी, कांजूरमार्ग, भांडुप, नाहूर, मुलुंड, ठाणे.
पश्चिम रेल्वे- चर्चगेट, मरिन लाइन्स, चर्नी रोड, ग्रॅण्ट रोड, मुंबई सेंट्रल, महालक्ष्मी, लोअर परेल, एलफिन्स्टन रोड, दादर, माटुंगा, वांद्रे, खार, सांताक्रुझ, विलेपार्ले, अंधेरी, जोगेश्वरी, गोरेगाव, मालाड, कांदिवली, बोरीवली, दहिसर.
गर्दीच्या वेळेत प्रवाशांना कोणताही त्रास होऊ नये यासाठी रात्री ९नंतर कामाला सुरुवात करण्यात येईल आणि ते मध्यरात्रीपर्यंत सुरूराहील.

Web Title: Railway stations to be 'colorful'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.