लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दूरस्थ उपस्थितीत देशातील अमृत भारत स्टेशन योजनेच्या अंतर्गत ५५४ रेल्वे स्टेशनच्या पुनर्विकासाचा शुभारंभ करण्यात आला. मुंबई विभागातील १२ रेल्वे स्थानकांसह मध्य रेल्वेच्या ३६ रेल्वे स्थानकांवर प्रवाशांचा प्रवास चांगला व्हावा, म्हणून आता अमृत भारत योजनेंतर्गत पुनर्विकासाची कामे केली जाणार आहेत.
भायखळा, सँडहर्स्ट रोड, चिंचपोकळी, वडाळा रोड, माटुंगा, कुर्ला, विद्याविहार, मुंब्रा, दिवा, शहाड, टिटवाळा आणि इगतपुरी या स्थानकांचा यात समावेश आहे, तर पश्चिम रेल्वे मार्गावरील रेल्वे स्थानकांचाही पुनर्विकास केला जाणार आहे. मरीन लाइन्स, चनीं रोड, ग्रँट रोड, लोअर परळ, प्रभादेवी, जोगेश्वरी, मालाड आणि पालघर या स्थानकांचा यात समावेश आहे. यावेळी १५८५ रोड ओवर ब्रिजेस (आरओबी) तसेच भूमिगत मार्गिकांच्या निर्मितीसाठी बांधकामाच्या कोनशिलांचे अनावरण यावेळी करण्यात आले.
मुंबईत रोज किमान ७३ लाख प्रवासी उपनगरीय रेल्वेने प्रवास करतात. एवढ्या संख्येने प्रवास करणारे प्रवासी असलेले हे एकमेव शहर आहे. प्रधानमंत्री नरेंद मोदी यांच्या हस्ते देशभरातील रेल्वे प्रकल्पांचे भूमिपूजन झाले ही आनंदाची बाब असून, या प्रकल्पांमध्ये महाराष्ट्रातील ५६ स्थानकांचा त्यात समावेश आहे.- एकनाथ शिंदे, मुख्यमंत्री