मुंबई : रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कोकण रेल्वेच्या प्रमुख सर्व स्थानकांच्या सुशोभीकरणाचे काम येत्या सात दिवसांत सुरू करण्यात येणार आहे. कोकण रेल्वेच्या सर्व स्थानकांच्या बाहेरील सर्व प्रमुख रस्त्यांचे क्रॉंक्रिटीकरण करण्यात येणार आहे. सार्वजनिक बांधकाममंत्री रवींद्र चव्हाण यांनी शुक्रवारी एका बैठकीत याबाबतचे आदेश दिले.
रत्नागिरी व कणवकवली येथे सुसज्ज रेल्वे पोलिस ठाणे उभारण्याच्या प्रक्रियेला वेग देण्यात येणार आहे. कोकण रेल्वे मार्गावरील बहुतेक स्थानकांची अवस्था अतिशय वाईट आहे. त्यामुळे ही सर्व रेल्वे स्थानके सुसज्ज करण्याचे काम सात दिवसांत सुरू करण्याचा निर्णय बैठकीत घेण्यात आला.
कोकण रेल्वेस्थानकांकडे जाणाऱ्या रस्त्यांच्या काँक्रिटीकरणासाठी १०० कोटी खर्च अपेक्षित आहे. कोकणवासी व मुंबईच्या चाकरमान्यांसाठी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वतीने हे रस्ते तयार केले जातील. कोकण रेल्वे प्रशासनाने ना हरकत प्रमाणपत्र दिल्यानंतर रस्त्यांचे काम युद्धपातळीवर सुरू करण्यात येईल, असेही चव्हाण यांनी स्पष्ट केले.
रत्नागिरी व कणकवली येथे दोन सुसज्ज पोलिस ठाणे बनविण्यात यावीत, तसेच याच परिसरात आठ पोलिस चौकी नव्याने तयार करण्याबाबतचे निर्देश त्यांनी दिले.
१ राजापूर रोड, सौंदळ, रत्नागिरी, भोके, आडवली, विलवडे, सावर्डा, चिपळूण, कामथे, दिवाणखवटी, कळंबणी, खेड, आयनी, मडुरा, सावंतवाडी, झाराप, कुडाळ, कणकवली, नांदगाव, खारेपाटण रोड, वैभववाडी रोड, आचिर्णे, सिंधुदुर्गनगरी या कोकण रेल्वे मार्गावरील प्रमुख स्थानकांना जोडणाऱ्या रस्त्यांचे काँक्रिटीकरण लगेच सुरू करण्यात येणार आहे. २नांदगाव रेल्वेस्थानकावरील रो- रो सुविधा पुन्हा सुरू करण्याबाबत सकारात्मक प्रयत्न करण्यात येतील, असेही या अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.