Join us

रेल्वे तिकीट आरक्षण यंत्रणा दहा तास कोमात; तांत्रिक बिघाडामुळे प्रवाशांना मनस्ताप

By ऑनलाइन लोकमत | Published: July 26, 2023 5:56 AM

‘आयआरसीटीसी’च्या ॲप आणि संकेतस्थळावरून रेल्वे तिकीट आरक्षण करणाऱ्या प्रवाशांना अनेक अडचणींना तोंड द्यावे लागत आहे.

मुंबई : ‘आयआरसीटीसी’च्या ॲप आणि संकेतस्थळावरून रेल्वे तिकीट आरक्षण करणाऱ्या प्रवाशांना अनेक अडचणींना तोंड द्यावे लागत आहे. मंगळवारी पहाटे २.५६ वाजल्यापासून हा गोंधळ सुरू झाला, तर दुपारी १.२८ च्या सुमारास सेवा पूर्ववत झाली. दहा तास संकेतस्थळ बंद होते. त्यामुळे तिकीट खिडक्यांवर जाऊन तिकीट आरक्षण करावे लागले. उपनगरी रेल्वेस्थानकांतील एटीव्हीएममधून तिकीट काढण्यासाठी ‘आयआरसीटीसी’मधून आर्थिक व्यवहार पूर्ण होत नसल्याने एटीव्हीएम कार्यरत नव्हते. ‘आयआरसीटीसी’च्या गोंधळामुळे प्रवाशांना प्रचंड मनस्ताप सहन करावा लागला.

मंगळवारी ‘आयआरसीटी’च्या सर्व्हरमध्ये तांत्रिक बिघाड झाल्याने देशभरातील रेल्वे तिकीट आरक्षण यंत्रणा कोलमडली. मंगळवारी पहाटे २.५६ वाजल्यापासून हा बिघाड झाला होता. यंत्रणेच्या फायरवॉलमध्ये तंत्रिक बिघाड झाल्याने आरक्षण यंत्रणा बंद झाल्या.  अनेक तासानंतरही ऑनलाइन यंत्रणा सुरू झाली नसल्याने मेल-एक्स्प्रेस तिकीट काढण्यासाठी रेल्वेस्थानकावर गर्दी वाढू लागली. त्यामुळे मध्ये रेल्वेच्या काही स्थानकांवर १२ अतिरिक्त तिकीट खिडक्या सुरू करण्यात आल्या होत्या. ऑनलाइन तिकीट मिळत नसल्याने प्रवाशांना पायपीट करावी लागली.

प्रतिमिनीट २५ हजार तिकिटे आरक्षित करता येतात

आयआरसीटीसीच्या संकेतस्थळावरून प्रतिमिनीट २५ हजार तिकिटे आरक्षित करता येतात. प्रवाशांची वाढती संख्या लक्षात घेता दर मिनिटाला २ लाख ५० हजार तिकिटांचे बुकिंग करता येऊ शकेल, अशी योजना आयआरसीटीसीकडून आखण्यात येत आहे.

टॅग्स :रेल्वेमुंबई