खंडाळा घाटात पुन्हा दरड कोसळली, पुण्याहून मुंबईकडे येणारी वाहतूक ठप्प
By ऑनलाइन लोकमत | Published: August 25, 2018 11:07 PM2018-08-25T23:07:01+5:302018-08-25T23:22:57+5:30
खंडाळा घाटात पुन्हा एकदा दरड कोसळली आहे. त्यामुळे पुण्याहून मुंबईकडे येणारी वाहतूक ठप्प झाली आहे.
मुंबई - मुंबई पुणे लोहमार्गावर मंक्की हिलजवळ आज रात्री 10.50 वाजण्याच्या सुमारास अप व मिडल या दोन्ही मार्गावर मोठ्या प्रमाणात दरड कोसळल्याने रेल्वे सेवा विस्कळीत झाली आहे. कोल्हापुर अहमदाबाद ही गाडी मार्ग बंद झाल्याने खंडाळा रेल्वे स्थानकावर थांबविण्यात आली आहे. कालच याठिकाणी मिडल लाईनवर दरड कोसळली होती.
लोणावळा व खंडाळा परिसरात मागील काही दिवसांपासून पावसाचा जोर असल्याने डोंगरभागातील सैल झालेले दगड मार्गावर येऊ लागले आहे. काल शुक्रवारी दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास देखिल याच ठिकाणी रेल्वे इंजिनच्या समोर दरड कोसळली होती. सुदैवाने त्यावेळी वाहतुकीवर परिणाम झाला नव्हता. आज मात्र दरड अप व मिडल या दोन्ही मार्गावर मोठ्या प्रमाणात पडल्याने वाहतुकीचा खोळंबा झाला आहे. दरड पडल्याची माहिती समजल्यानंतर लोणावळा व कल्याण येथिल आपत्कालिन यंत्रणा घटास्थळी दाखल झाली असून मोठे दगड बाजुला करण्याचे काम सुरु झाले आहे. घाट परिसरात रात्रीचा अंधार व पाऊस असल्याने कामात अडथळा येत असल्याने मार्ग सुरु होण्यास विलंब होणार आहे.