मुंबई : कोकण रेल्वेमार्गावर गोवा राज्यातील करमाळी आणि थिव्हिम स्टेशनदरम्यान असलेल्या जुना गोवा बोगद्यात मुसळधार पावसामुळे सोमवारी ट्रॅकवर माती व पाणी आले आहे. त्यामुळे कोकण रेल्वे वाहतूक विस्कळीत झाली आहे. या ट्रॅकवरील माती हटविण्याचे काम युद्धपातळीवर सुरू असून, या कालावधीत सर्व गाड्या नजीकच्या स्थानकांमध्ये थांबवून ठेवण्यात आल्या आहेत. रात्री उशिरापर्यंत ही वाहतूक सुरळीत झाली नव्हती.
गोवा राज्यातील कारवार विभागात करमाळी आणि थिविम स्टेशनदरम्यान सुरू असलेल्या जुन्या गोवा बोगद्यात मोठ्या प्रमाणात पाणी साचले आहे. सतत मुसळधार पाऊस कोसळत आहे. त्यामुळे हे पाणी साचल्याचे सांगण्यात आले आहे. पाणी आणि चिखल यामुळे कोकण रेल्वे मार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली आहे. विविध स्थानकांवर गाड्या थांबविण्यात आल्या आहेत. अमृतसर-कोचुवेली स्पेशल ही गाडी पनवेलमार्गे कर्जत-पुणे-मिरज-हुबळी-कृष्णराजपुरम-इरोड-शोरानूर अशी वळविण्यात आली आहे. कोकण रेल्वेवरील ट्रॅकवर आलेल्या मातीच्या ढिगाऱ्यामुळे रेल्वेसेवा विस्कळीत झाली आहे.