रेल्वे प्रवास धोक्याचाच!
By admin | Published: January 15, 2016 03:54 AM2016-01-15T03:54:10+5:302016-01-15T03:54:10+5:30
कामानिमित्त रात्री उशिरा प्रवास करणे हे आता महिलांसाठी नवे राहिलेले नाही, मात्र अशा रात्रीच्या रेल्वे प्रवासादरम्यान आजही महिलांना फलाटांवरचा शुकशुकाट, डब्यातील सुरक्षारक्षकाची
कामानिमित्त रात्री उशिरा प्रवास करणे हे आता महिलांसाठी नवे राहिलेले नाही, मात्र अशा रात्रीच्या रेल्वे प्रवासादरम्यान आजही महिलांना फलाटांवरचा शुकशुकाट, डब्यातील सुरक्षारक्षकाची अनुपस्थिती आणि संशयास्पद नजरा अशा अनेक समस्यांचा सामना करावा लागतो. ‘लोकमत’च्या महिला प्रतिनिधींनी रात्री ११ ते १ च्या दरम्यान तीनही रेल्वे मार्गांवरून प्रवास केला. ‘लोकमत रिअॅलिटी चेकमधून’ उजेडात आलेले हे वास्तव...
सायन स्थानकातून रात्री ११.२७च्या सीएसटीकडे जाणाऱ्या लोकलची वाट प्रस्तुत प्रतिनिधी पाहत होती. फलाटावर काळोख होता. बाजूने जाणाऱ्या एका व्यक्तीने संवाद साधण्याचा प्रयत्न केला. तथापि, प्लॅटफॉर्मवरील पोलीस पाहून त्याने काढता पाय घेतला. ११.२७ ची लोकल रद्द झाल्याने पर्यायी ११.५२च्या लोकलमधील मधल्या डब्यात महिला प्रतिनिधी चढली. आत पोलीस असल्याचे पाहून तिच्या मनातली भीती काहीशी कमी झाली. ३-४ महिला आणि पोलीस एवढेच लोक डब्यात होते. तेव्हा ड्यूटीवरील पोलिसाशी संवाद साधून प्रतिनिधी परळ स्थानकात उतरली.
महालक्ष्मी स्थानकावर ११.५९ ची ट्रेन १२.०९ ला आली. महिलांच्या पुढच्या डब्यात प्रतिनिधी चढली. या डब्यात पोलीस नव्हता. त्यामुळे तिने पोलीस नियंत्रण कक्षाला फोन लावला. तेव्हा काय मदत हवी, असे विचारण्यात आले. महालक्ष्मीहून निघालेल्या ट्रेनमध्ये महिला डब्यात पोलीस नसल्याचे सांगितले. मुंबई सेंट्रलला ट्रेन आली असून पोलीस पाठवेपर्यंत थोड्याच वेळात चर्चगेट येईल, असे सांगण्यात आले. ग्रॅण्ट रोड स्थानकात डबादेखील रिकामा झाला. या स्थानकावर बाजूच्या डब्यात असलेला एक पोलीस डब्यात चढला. पोलिसाला धन्यवाद देत महिला प्रतिनिधीने चर्नी रोडला लोकल सोडली
प्रस्तुत प्रतिनिधीने करी रोड स्थानकातून १२.०५ची लोकल पकडली. शेवटच्या महिला डब्यात ना महिला होत्या ना पोलीस. त्यात शेजारी असलेला पुरुषांचा फर्स्ट क्लास डबाही रिकामा. भायखळा स्थानक आल्यानंतरही पोलीस वा प्रवासी कोणीही डब्यात न चढल्याने तिने रेल्वे पोलिसांच्या नियंत्रण कक्षाला फोन केला. बराच वेळ फोन उचलण्यातच आला नाही.
थोड्या वेळात फोन उचलल्यानंतर प्रतिनिधीने, मी डब्यात एकटीच असून भीती वाटत असल्याचे सांगितले. आपण पोलिसांना पाठवू शकता का, अशी विचारणाही केली. तेव्हा पोलिसांना पाठवेपर्यंत तुम्ही सीएसटीला पोहोचाल, त्यापेक्षा सँडहर्स्ट रोडला उतरून पुरुषांच्या डब्यात बसा, असा सल्ला त्यांनी दिला. त्यात मस्जिद ते सीएसटीदरम्यान लोकल मध्येच थांबली. या परिसरात गर्दुल्ल्यांचा वावर असतो. सीएसटी स्थानकात लोकल पोहोचताच प्रतिनिधीने सुटकेचा नि:श्वास सोडला. विशेष म्हणजे भायखळा ते सीएसटी दरम्यान कोणत्याही स्टेशनच्या फलाटावर एकही पोलीस नव्हता.
माटुंगा रोड स्थानकावर रात्री ११.३०च्या सुमारास ‘लोकमत’ प्रतिनिधी पोहोचली. स्थानकावर तुरळक गर्दी होती. एक पोलीस होता. इंडिकेटरवर ११.३४ ची ट्रेन लावली होती. ती ट्रेन ११.४९ ला स्थानकात आली. डब्यात पोलीस होता. महिला प्रतिनिधीने त्याच्याशी संवाद साधला.
पश्चिम रेल्वेच्या पुढच्या आणि मधल्या महिला डब्यात पोलीस असतो. शेवटच्या सेकंड क्लासमध्ये पोलीस नसतो, पण त्याच्या बाजूच्या फर्स्ट क्लासच्या महिला डब्यात पोलीस असतो. तोच लक्ष ठेवतो, असेही पोलिसाने सांगितले. पोलीस असल्याने प्रतिनिधीने निश्चिंतपणे
प्रवास केला.
शिवडीतील ‘ती’ सात मिनिटे
सीएसटीला जाणाऱ्या लोकलच्या पहिल्या महिला डब्यात चढण्यासाठी प्रतिनिधी वाट पाहत होती. फलाट क्रमांक २ वर शुकशुकाट होता आणि पुढच्या भागातील दिवे बंद होते. तेव्हा एक इसम घिरट्या घालू लागला. महिला प्रतिनिधीला असुरक्षित वाटू लागले. फलाटावर एकही पोलीस नव्हता. मागून कोणीतरी येत असल्याची चाहूल लागली. मागे वळून पाहता थेट रस्त्यावरून कुणीही फलाटावर येणे शक्य असल्याचे दिसून आले. मोबाइल किंवा पर्स खेचून कोणी तरी पळून जाईल, अशी भीती प्रतिनिधीला वाटत होती. घिरट्या घालणाऱ्या तरुणाकडे आणि प्रतिनिधीकडे प्लॅटफॉर्मवरील लोक पाहत होते, मात्र त्याला कोणीही हटकले नाही. अखेर सात मिनिटांनी ट्रेन आली आणि प्रतिनिधीने सुटकेचा नि:श्वास सोडला.
जनरल
डब्यात मद्यपान
रात्री १२.५० वाजता चर्चगेटहून विरारला जाणाऱ्या लोकलमध्ये महिला प्रतिनिधी जनरल डब्यात चढली. या वेळी या डब्यात हाताच्या बोटावर मोजता येतील, एवढेच प्रवासी होते. त्यात डब्याच्या एका कोपऱ्यात सहा ते सात प्रवाशांचा ग्रुपही होता.
लोकल सुरू होताच त्यांनी वर्तमानपत्रात गुंडाळलेली बाटली बाहेर काढली. डब्यात दारूचा वास पसरला. एकाने चिप्सचे पाकीटही काढले. त्यांच्या गप्पांमधून लगेचच ते मद्यपान करत असल्याचे कळले. त्यामुळे महिला डब्यात पोलीस नसताना पुरुष डब्यातून प्रवास करण्याचा पोलिसांकडून देण्यात येणारा सल्ला कितपत योग्य आहे, असा प्रश्नही उपस्थित झाला.
महालक्ष्मी स्थानकावर लोकलची वाट पाहत असताना चर्चगेटला जाणारी लोकल काही मिनिटे उशिरा आली. तेव्हा राउंडवरील पोलीस येऊन गेले. लोकल आल्यावर मधल्या महिला डब्यात प्रतिनिधी चढली. तेव्हा एका पोलिसाची उपस्थिती होती. पोलिसाशी संवाद साधला असता, रात्री पश्चिम रेल्वेच्या सर्व महिला डब्यांमध्ये पोलीस कर्मचारी ड्यूटीसाठी असल्याची माहिती त्यांनी दिली. शिवाय, ‘तुम्ही निश्चिंत प्रवास करा’ असेही म्हटले. या संवादानंतर महिला प्रतिनिधी चर्चगेट स्थानकावर उतरली. महालक्ष्मी ते चर्चगेट दरम्यानच्या स्थानकांवरील प्लॅटफॉर्मवर मात्र शुकशुकाट होता.
शिवडी-सीएसटी प्रवासावेळी डब्यात पोलीस होता. ट्रेनमध्ये प्रतिनिधीव्यतिरिक्त एकही महिला नव्हती. शिवडी प्लॅटफॉर्मवरील अनुभव प्रतिनिधीने पोलिसाला सांगितला. डब्यामध्ये महिला सुरक्षित आहेत. प्लॅटफॉर्म आणि स्टेशन परिसर अधिक धोकादायक असल्याचे या पोलिसानेही कबूल केले. तैनात असलेले पोलीस शेवटच्या लोकलने पनवेलपर्यंत जाऊन पहिल्या लोकलने परत येतात, अशी माहितीही त्यांनी दिली.
कुर्ला स्थानकावर शेवटच्या महिला डब्यात चढण्यासाठी प्रतिनिधी फलाटावर उभी होती. लोकलमध्ये चढल्यावर तिला डब्यात १५-१६ महिला आणि जीआरपी जवान दिसून आला. वडाळा स्टेशनपर्यंत प्रतिनिधीसह तीन महिला डब्यात उरल्या. शिवडीपर्यंत संपूर्ण डबा रिकामा झाला. तेव्हा महिला सुरक्षिततेबाबत जवानाकडे विचारणा केली. शेवटच्या लोकलपर्यंत महिलांच्या डब्यात जीआरपी जवान असल्याची माहिती त्याने दिली.
संकलन दीप्ती देशमुख, स्नेहा मोरे, पूजा दामले, मनीषा म्हात्रे, लीनल गावडे