Join us  

महिलांसाठी रेल्वे असुरक्षित - हायकोर्ट

By admin | Published: February 04, 2016 4:15 AM

दोन दिवसांपूर्वी धावत्या लोकलमध्ये फर्स्ट क्लासच्या डब्ब्यात एका महिलेचा विनयभंग करण्यात आल्याची बाब गांभीर्याने घेत उच्च न्यायालयाने महिलांसाठी रेल्वे असुरक्षित असल्याचे म्हटले.

मुंबई : दोन दिवसांपूर्वी धावत्या लोकलमध्ये फर्स्ट क्लासच्या डब्ब्यात एका महिलेचा विनयभंग करण्यात आल्याची बाब गांभीर्याने घेत उच्च न्यायालयाने महिलांसाठी रेल्वे असुरक्षित असल्याचे म्हटले. दुपारच्या वेळेतही लोकलमध्ये जीआरपी ठेवण्याची वेळ आली आहे, असेही उच्च न्यायालयाने म्हटले.महिलांच्या सुरक्षिततेबाबत आणि वरिष्ठ नागरिकांसाठी लोकलमध्ये स्वतंत्र डबा आरक्षित ठेवण्याबाबत उच्च न्यायालयात अनेक याचिका दाखल करण्यात आल्या आहेत. या याचिकांवरील सुनावणी न्या. नरेश पाटील व न्या. गिरीश कुलकर्णी यांच्या खंडपीठापुढे होती.दोन दिवसांपूर्वी पश्चिम रेल्वेच्या धावत्या लोकलमध्ये फर्स्ट क्लासच्या डब्ब्यात एका महिलेचा विनयभंग करण्यात आला. याची दखल घेत खंडपीठाने महिलांसाठी रेल्वे असुरक्षित असल्याचे म्हटले. ‘आता दुपारच्यावेळीही लोकलमध्ये जीआरपीवाले तैनात करण्याची वेळ आली आहे. कमी मनुष्यबळ असल्यास रेल्वेने रोटेशन पद्धतीने जीआरपींना लोकलमध्ये तैनात करावे. आतापर्यंत अशी एकही घटना नाही की, असा प्रसंग घडला आणि जीआरपीने हस्तक्षेप केला, असे म्हणत खंडपीठाने लाईव्ह सीसीटीव्ही लोकलमध्ये बसवण्यासंदर्भात रेल्वेला पुन्हा एकदा सूचना केली.दरम्यान, ट्रॅकच्या बाजूला लोकलला वीज पुरवणारे पोल अत्यंत धोकादायक आहेत. अनेक जणांचे जीव या पोलमुळे गेले आहेत. त्यामुळे हे पोल टॅकच्या शेवटी बसवणे शक्य आहे का? अशी विचारणा खंडपीठाने रेल्वेला केली. मात्र हे शक्य नसल्याचे रेल्वेचे वकील सुरेश कुमार यांनी खंडपीठाला सांगितले. (प्रतिनिधी)