‘रेल्वेचे खासगीकरण होऊ देणार नाही’; 1 जुलै रोजी काळ्या फिती बांधून करणार निदर्शने

By ऑनलाइन लोकमत | Published: June 30, 2019 02:34 AM2019-06-30T02:34:45+5:302019-06-30T02:34:59+5:30

रेल्वे प्रशासनाच्या पुढील १०० दिवसांतील कृती आराखड्यात अनेक प्रकल्प हाती घेण्यात आले आहेत.

'Railway will not be privatized'; On July 1, there were protests going on in black ribs | ‘रेल्वेचे खासगीकरण होऊ देणार नाही’; 1 जुलै रोजी काळ्या फिती बांधून करणार निदर्शने

‘रेल्वेचे खासगीकरण होऊ देणार नाही’; 1 जुलै रोजी काळ्या फिती बांधून करणार निदर्शने

Next

- कुलदीप घायवट

मुंबई : रेल्वे प्रशासनाच्या पुढील १०० दिवसांतील कृती आराखड्यात अनेक प्रकल्प हाती घेण्यात आले आहेत. मात्र याअंतर्गत रेल्वे
प्रशासन दोन मेल, एक्स्प्रेसचे खासगीकरण करणार आहे. ही सुरुवात असून हळूहळू भारतीय रेल्वेचे खासगीकरण करण्याचा प्रशासनाचा डाव आहे. मात्र, काहीही झाले तरी रेल्वेचे खासगीकरण होऊ देणार नाही, असे नॅशनल रेल्वे मजदूर युनियनचे महामंत्री वेणू नायर यांनी स्पष्ट केले. याविरोधात १ जुलै रोजी काळ्या फिती बांधून निदर्शने करण्यात येतील, असेही त्यांनी सांगितले. यानिमित्ताने त्यांच्याशी केलेली बातचित...

प्रश्न- रेल्वेचे खासगीकरण होत आहे का?
उत्तर- हो. भारतीय रेल्वेचे खासगीकरण करून उद्योगपतींना रेल्वे विकण्याचा डाव रचण्यात येत आहे. परळ कारखाना, माटुंगा वर्कशॉप व इतर ठिकाणचे कारखाने बंद करून या जागा बिल्डर, उद्योगपतींच्या घशात घालण्याचा कुटिल डाव आहे. रेल्वेची सेवा सुधारण्याऐवजी मोनो, मेट्रो, बुलेटसारखे प्रकल्प आणून रेल्वेची कमी पैशांतील सवलत बंद करण्याचा घाट घातला जात आहे. मात्र नॅशनल रेल्वे मजदूर युनियनकडून याचा कायम विरोध केला जाईल.

प्रश्न - मेल, एक्स्प्रेस, लोकलचा धक्का लागून अनेकदा रेल्वे कामगारांचा मृत्यू होतो. हे रोखण्यासाठी काय करता येईल?
उत्तर - रेल्वे सेवा कायम सुरू ठेवण्याचे ध्येय प्रत्येक कामगाराचे असते. या ध्येयापायी रेल्वे कामगार ऊन, पाऊस, वारा यामध्ये काम
करीत असतात. काही वेळा कामात मग्न असताना रेल्वेचा अंदाज न आल्यामुळे कामगारांचा मृत्यू होतो. पूर्वी कामगारांची संख्या जास्त होती. यामध्ये रेल्वे मार्गांवर काम करणारा आणि त्याला सुरक्षा देणारा कामगारही असे. मात्र आता कामगारांची भरती करण्यात येत
नाही. त्यामुळे अपघातांना थांबविणे कठीण आहे. कंत्राटी कामगारांना त्यांचे हक्क मिळण्यासाठी आम्ही काम करीत आहोत.

मेल, एक्स्प्रेस-ऐवजी लोकलला प्राधान्य देणे गरजेचे
रेल्वे ही स्वस्त, सुरक्षित वाहतूक सेवा आहे. यातून लाखो प्रवासी प्रवास करतात. अनेक कुटुंबीयांचा उदरनिर्वाह होतो. त्यामुळे तांत्रिक बिघाड तसेच अन्य समस्या सोडवून लोकलच्या वेळापत्रकाचे नियोजन व्यवस्थित करणे गरजेचे आहे. प्रवाशांचा प्रवास वेळेत होण्यासाठी लोकल वेळेवर चालविणे आवश्यक आहे. सकाळ आणि सायंकाळच्या गर्दीच्या वेळी मेल, एक्स्प्रेसऐवजी लोकलला प्राधान्य दिले पाहिजे, असे ते म्हणाले.

पायाभूत सुविधा वाढविण्यासाठी काय करता येईल?
रेल्वे प्रशासनाकडून देशातील ६ हजार ४८५ रेल्वे स्थानकांवर वायफाय बसविण्यात येणार आहे. मात्र देशासह राज्यात अशी अनेक स्थानके आहेत, जेथे दोनपेक्षा जास्त मेल, एक्स्प्रेस येत नाहीत. येथे प्रवाशांची संख्या कमी असते. त्यामुळे वायफायची सुविधा आणण्यापेक्षा किंवा त्यावर पैसे खर्च करण्यापेक्षा प्रवाशांच्या पायाभूत सुविधांकडे लक्ष दिले पाहिजे, असे त्यांनी स्पष्ट केले.

वायफायद्वारे हायफाय प्रवासाला प्राधान्य देण्यापेक्षा प्रवाशांच्या पायाभूत सुविधांना प्राधान्य देणे गरजेचे आहे. - वेणू नायर

Web Title: 'Railway will not be privatized'; On July 1, there were protests going on in black ribs

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :railwayरेल्वे