रेल्वे महिला पोलिसाचे पतीसह अपहरण
By admin | Published: January 9, 2016 02:53 AM2016-01-09T02:53:34+5:302016-01-09T02:53:34+5:30
बोरीवली लोहमार्ग पोलीस ठाण्यातील एका महिला पोलिसाचे तिच्या पतीसह अपहरण करण्यात आल्याची घटना दहिसरमध्ये गुरुवारी सायंकाळी उघडकीस आली.
गौरी टेंबकर-कलगुटकर, मुंबई
बोरीवली लोहमार्ग पोलीस ठाण्यातील एका महिला पोलिसाचे तिच्या पतीसह अपहरण करण्यात आल्याची घटना दहिसरमध्ये गुरुवारी सायंकाळी उघडकीस आली. या अपहरणाची माहिती देणारा एक ‘एसएमएस’ बोरीवली रेल्वे पोलिसांना मिळाल्यानंतर या प्रकरणी दहिसर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली.
सुनीता कोंडवलकर (३०) आणि किरण (३५) अशी अपहरण करण्यात आलेल्यांची नावे आहेत. यातील महिला ही बोरीवली लोहमार्ग पोलीस ठाण्यात पोलीस शिपाई म्हणून कार्यरत असून, पती किरणसोबत दहिसरला राहते. बोरीवली लोहमार्ग पोलीस ठाण्यातील एका पोलीस शिपायावर दिवाळीमध्ये तिने विनयभंगाचा गुन्हा नोंदविला होता. त्याच्यापासून तिच्या जिवाला धोका असल्याचेही तिने रेल्वे पोलीस आयुक्तांना कळविले होते; आणि संरक्षण देण्यात यावे, असा अर्जही दाखल केला. त्यानुसार आयुक्तांनी बोरीवली लोहमार्ग पोलीस ठाण्याच्या एका महिला पोलिसाला सुनीतासोबत राहण्याचे निर्देश दिले. दहिसर पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक राकेश पवार यांनी ‘लोकमत’ला दिलेल्या माहितीनुसार, गुरुवारी सायंकाळीही नेहमीप्रमाणे सुनीताला त्या महिला पोलिसाने तिच्या घराजवळ असलेल्या नेहमीच्या ठिकाणी सोडले आणि ती परतली. त्या वेळी सुनीताचा पतीदेखील तिच्यासोबत होता. मात्र ते दोघे घरी गेले नसल्याचे सुनीता राहत असलेल्या ठिकाणाच्या सीसीटीव्ही फूटेजमध्ये आढळले आहे.
रात्री १०च्या सुमारास सुनीताचा पती किरणच्या मोबाइलवरून बोरीवली लोहमार्ग पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय पाटील यांना एसएमएसमधून त्या दोघांचे अपहरण झाल्याचे समजले. दोघांकडे ७ ते ८ मोबाइल हँडसेट आहेत आणि ते वारंवार सिमकार्ड बदलतात. त्यामुळे त्यांचे ‘कॉल’ लोकेशन शोधणेदेखील अवघड होत असल्याचे पवार यांनी सांगितले.