Join us

रेल्वेच्या महिला पोलिसाला अटक

By admin | Published: October 03, 2015 3:17 AM

कोणालाही माहिती न देता घरातून पळून आलेल्या १५ वर्षीय मुलीला तीन महिने घरकामासाठी राबवणाऱ्या कल्याण रेल्वेच्या महिला पोलिसाचा प्रताप उघडकीस आला आहे.

ठाणे : कोणालाही माहिती न देता घरातून पळून आलेल्या १५ वर्षीय मुलीला तीन महिने घरकामासाठी राबवणाऱ्या कल्याण रेल्वेच्या महिला पोलिसाचा प्रताप उघडकीस आला आहे. तिच्या तावडीतून मुलीची सुटका करून पोलीस कॉन्स्टेबल इंदू केळकर हिला अटक केल्याची माहिती पोलिसांनी दिली. कर्नाटक, गुलबर्गा येथील १५ वर्षीय मुलगी सावत्र आईच्या जाचाला कंटाळून तीन महिन्यांपूर्वी कल्याणात आली होती. याचदरम्यान कल्याण रेल्वेची महिला कॉन्स्टेबल केळकर हीच्या ही मुलगी निदर्शनास आली. मुलीला घरी जायचे नसल्याचा फायदा घेऊन केळकरने तिला आपल्या घरी नेऊन घरकामाला लावले. याबाबत, डिस्ट्रीकट चाइल्ड प्रोटेक्शन या संस्थेचे सदस्य परमेश्वर धसाडे यांच्याकडे अर्ज आला होता. तातडीने त्या संस्थेने ठाणे शहर पोलिसांच्या चाइल्ड प्रोटेक्शन युनिटशी संपर्क साधून गुरुवारी कल्याण, सूचकनाका येथील तिच्या घरावर धाड टाकली. तेथून मुलीची सुटका करून तिची रवानगी भिवंडी बालसुधारगृहात केली आहे. तर, केळकर हिच्याविरोधात कोळसेवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्यावर पोलिसांनी तिला अटक केल्याची माहिती पोलीस उपनिरीक्षक कमाउद्दीन शेख यांनी दिली. ठाणे शहर सहायक पोलीस आयुक्त भरत शेळके यांच्या मार्गदर्शनाखाली चाइल्ड प्रोटेक्शन युनिटचे सहायक पोलीस उपनिरीक्षक प्रभाकर शिंदे, हवालदार प्रमोद पाटील, पोलीस नाईक नथुराम चव्हाण, सुरेखा कदम, छाया गोसावी आणि कौसर मुल्ला यांनी ही कारवाई केली. (प्रतिनिधी)