रेल्वेला राज्य सरकारच्या प्रस्तावाची प्रतीक्षा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 10, 2021 04:06 AM2021-01-10T04:06:22+5:302021-01-10T04:06:22+5:30
सर्वांसाठी लोकल प्रवास : प्रवासी संघटनांची संमिश्र प्रतिक्रिया लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मुंबईतील लोकल सेवा अजूनही ...
सर्वांसाठी लोकल प्रवास : प्रवासी संघटनांची संमिश्र प्रतिक्रिया
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मुंबईतील लोकल सेवा अजूनही सर्वसामान्यांसाठी बंदच आहे. मर्यादित घटकांसाठी लोकल सेवा सुरू असून त्यामध्ये एक-एक घटकाची वाढ करण्यात येत आहे. पुढील आठवड्यात सर्वांसाठी लोकल सेवा सुरू करण्याबाबतचा निर्णय घेणार असल्याची माहिती राज्य सरकारने न्यायालयात दिली आहे. मात्र याबाबतचे पत्र अद्याप रेल्वेला दिलेले नाही.
रेल्वेच्या एका अधिकाऱ्यांनी सांगितले की, नियमित रेल्वे फेऱ्यांच्या तुलनेत आता उपनगरीय रेल्वेच्या ९० टक्के फेऱ्या होत आहेत. १० टक्के फेऱ्या वाढविण्यास वेळ लागणार नाही. रेल्वेची पूर्ण तयारी आहे. सरकारच्या प्रस्तावाला रेल्वे बोर्डाने मंजुरी दिल्यानंतर मध्य आणि पश्चिम रेल्वे मार्गावरून लोकल सुरू होतील. मात्र प्रश्न गर्दीचा आहे. सर्वांसाठी रेल्वे सुरू झाल्यास गर्दी मोठ्या प्रमाणात वाढेल. त्याला आवर घालणे सोपे नाही. सोशल डिस्टन्सिंग पाळले जाणार नाही.
सर्वांना रेल्वे प्रवासाची मुभा देण्याबाबत राज्य सरकारने कोणताही प्रस्ताव दिलेला नाही. प्रस्ताव आल्यानंतर निर्णय होईल. सध्या ९० टक्के रेल्वे फेऱ्या सुरू आहेत. उर्वरित १० टक्के फेऱ्या सुरू करण्याची आमची तयारी आहे.
- अनिलकुमार जैन, वरिष्ठ जनसंपर्क अधिकारी, मध्य रेल्वे
रेल्वे सुरू करण्यास उशीर
आता जी परिस्थिती आहे ती तीन महिन्यांपूर्वीही होती. सकाळी आणि सायंकाळी प्रवाशांची गर्दी होत आहे. राज्य सरकारने अनेकवेळा रेल्वे सुरू करण्याचे आश्वासन दिले ते पाळले नाही. आता परिस्थिती नियंत्रणात आहे, पण राज्य सरकारने परवानगी देण्यास उशीर केला आहे.
- मधू कोटीयन, अध्यक्ष, मुंबई रेल्वे प्रवासी संघ
...तर राज्य सरकारची जबाबदारी
कोरोनाची रुग्णसंख्या कमी होत आहे, पण सर्वांसाठी रेल्वे सुरू करताना राज्य सरकारने सोशल डिस्टन्सिंग, मास्क याची जबाबदारी घ्यावी. सर्वांना रेल्वे प्रवासाची मुभा दिल्यास मोठ्या प्रमाणात गर्दी होईल. त्यामुळे सरकारने आणखी वेळ घ्यायला हवा.
- सदानंद पावगी, उपाध्यक्ष, रेल्वे प्रवासी संघ