मुंबई : परळ ते दादरदरम्यान रेल्वे रुळांलगत रेल्वेच्या ‘ग्रो मोअर फूड’ योजनेअंतर्गत भाज्यांचे पीक घेतले जात असून, यासाठी सांडपाण्याचा वापर होत असल्याचे निदर्शनास आल्याने रेल्वे प्रशासनाने संबंधितांना भाजी उत्पादनासाठी दिलेली परवानगी रद्द केली. मध्य, पश्चिम व हार्बर रेल्वे रुळालगत भाज्यांचे उत्पादन घेतले जाते. भाज्यांची शेती करताना सांडपाण्याचा वापर केला जात होता.रेल्वे प्राधिकरणाच्या मध्य व पश्चिम रेल्वे अंतर्गत ‘ग्रो मोअर फूड’ योजनेंतर्गत मुंबई व ठाणे भागातील रेल्वे रुळाच्या जागेमध्ये भाज्यांचे उत्पादन केले जाते. या भाज्या मुंबई, ठाणे परिसरात विकल्या जातात. सांडपाणी किंवा अशुद्ध पाण्याचा वापर करून पिकवलेल्या भाज्या आरोग्यास हानिकारक असतात. त्यामुळे मुंबई उच्च न्यायालयाने रेल्वे प्राधिकरणाला भाज्या पिकविण्यासाठी सांडपाण्याचा वापर करू नये, असे निर्देश दिले आहेत. त्याचे उल्लंघन करण्यात आल्याप्रकरणी ही कारवाई करण्यात आली.अन्न व औषध प्रशासनाच्या आयुक्त डॉ. पल्लवी दराडे यासंदर्भात सांगितले की, मध्य रेल्वेच्या ‘ग्रो मोअर फूड’ योजनेंतर्गत परवानाधारकांना सांडपाणी न वापरण्याबाबत दक्षता घेण्याचे निर्देश दिले आहेत. तसेच सर्व महत्त्वाच्या रेल्वे स्थानक अधिकाऱ्यांना सांडपाण्याचा वापर भाज्या पिकविण्यासाठी होऊ नये, याकडे लक्ष देण्यास सांगितले आहे. मुंबई व ठाणे उपनगरीय रेल्वे रुळालगत सांडपाण्याचा वापर करून भाजीपाला पिकविण्यास सक्त मनाई आहे. रेल्वे प्रशासनातर्फे भाज्यांची गुणवत्ता तपासण्यासाठी २००९, २०११ व २०१७ साली केलेल्या भाज्या तपासणीचे निष्कर्ष समाधानकारक आहेत. २०१९-२० मध्ये भाज्या तपासणी प्रक्रियाधीन असल्याचे मध्य रेल्वेने अन्न व औषध प्रशासनास कळविले आहे. पश्चिम रेल्वेकडून अद्याप माहिती प्राप्त झालेली नाही.
रेल्वेलगतच्या भाजी उत्पादकांची परवानगी रेल्वेने केली रद्द
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 04, 2019 1:26 AM