रेल्वेचा महिनाभरात २२ कोटी ८७ लाखांचा दंड वसूल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 12, 2019 11:58 PM2019-11-12T23:58:48+5:302019-11-12T23:58:49+5:30
ऑक्टोबरमध्ये मध्य रेल्वे मार्गावरून विनातिकीट प्रवाशांना पकडून त्यांच्याकडून २२ कोटी ८७ लाखांचा दंड वसूल केला गेला.
मुंबई : ऑक्टोबरमध्ये मध्य रेल्वे मार्गावरून विनातिकीट प्रवाशांना पकडून त्यांच्याकडून २२ कोटी ८७ लाखांचा दंड वसूल केला गेला. ऑक्टोबर महिन्यात दिवाळी, छटपूजा सण होते. या सणांच्या दिवशी जास्त संख्येने विनातिकीट प्रवाशांना पकडण्यात आल्याची माहिती मध्य रेल्वे प्रशासनाने दिली. मध्य रेल्वे मार्गावर आॅक्टोबर महिन्यात विनातिकीट प्रवास करणाऱ्या ४ लाख ५ हजार प्रवाशांवर गुन्हे दाखल झाले. यातून मध्य रेल्वेने २२ कोटी ८७ लाख रुपयांचा दंड वसूल केला. २१ आॅक्टोबर ते १ नोव्हेंबर या कालावधीत विनातिकीट प्रवाशांना रोखण्यासाठी विशेष मोहीम राबविली होती.
>मागील वर्षीपेक्षा
जादा दंडवसुली
मागील वर्षी आॅक्टोबर महिन्यात २ लाख ४० हजार गुन्ह्यांची नोंद करण्यात आली. १३ कोटी ४२ लाखांचा दंड वसूल करण्यात आला. मागील वर्षीपेक्षा या वर्षी ५१.८४ टक्क्यांनी विनातिकीट प्रवाशांची वाढ झाली आहे. एप्रिल ते आॅक्टोबर २०१९ या कालावधीत मध्य रेल्वे मार्गावर २४ लाख ४ हजार गुन्ह्यांची नोंद करण्यात आली. यामध्ये १२६ कोटी ६७ लाख रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. आॅक्टोबर महिन्यात आरक्षित प्रवासी तिकिटांच्या हस्तांतरणाची ६९५ प्रकरणे नोंदविण्यात आली असून यातून ५ लाख ६० हजार रुपयांचा दंड आकरण्यात आला.