Join us

रेल्वेच्या ‘कलव्हर्ट’ स्वच्छतेवरील ३० कोटी पाण्यात गेले वाहून !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 10, 2021 4:06 AM

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : उपनगरीय रेल्वे सेवा कुर्ला आणि सायन येथे पावसाचे पाणी साठल्याने बंद करण्यात आली असून ...

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : उपनगरीय रेल्वे सेवा कुर्ला आणि सायन येथे पावसाचे पाणी साठल्याने बंद करण्यात आली असून कलव्हर्ट (मोरी) स्वच्छ न झाल्याचा फटका रेल्वे सेवेला बसला, असा आरोप आरटीआय कार्यकर्ते अनिल गलगली यांनी केला आहे.

गेल्या १२ वर्षात ३० कोटींहून अधिक रक्कम रेल्वेच्या ११६ कलव्हर्टवर खर्च करण्यात आले असून ३० कोटी पाण्यात वाहून गेले आहेत. मुंबईतील रेल्वे अंतर्गत कलव्हर्ट प्रत्येक वर्षी रेल्वे प्रशासन स्वच्छ करते आणि पालिका प्रत्येक वर्षी ३ ते ४ कोटी शुल्क अदा करते. मागील १२ वर्षात रेल्वेला ३० कोटी प्राप्त झाले आहेत पण आजमितीस कोणत्याही प्रकारचे ऑडिट ना रेल्वेने केले ना पालिकेने केलेल्या खर्चाचा हिशेब मागितला. आज मुंबई रेल्वे सेवा अंतर्गत ११६ कलव्हर्ट असून ५३ मध्य रेल्वे, ४१ पश्चिम रेल्वे आणि २२ हार्बर रेल्वेत आहेत. वर्ष २००९-२०१० ते वर्ष २०१७-१८ या ९ वर्षात २३ कोटी रुपये मुंबई पालिकेने रेल्वे प्रशासनाला दिले होते. वर्ष २०१८-१९ मध्ये ५.६७ कोटी रुपये दिले होते. एकंदरीत मागील १२ वर्षात ३० कोटीहून अधिक रक्कम देण्यात आली आहे. यावर्षी पालिकेने सीएसएमटी ते मुलुंडपर्यंतच्या रेल्वेच्या सर्व नाल्यांची सफाई अवघ्या १५ दिवसात पूर्ण करण्याचा दावा केला आहे.

गलगली यांच्या मते दरवर्षी पावसाळ्यापूर्वी पालिका रेल्वेला पैसे तर मोजते पण या मोरी सफाईचे कोठल्याही प्रकारचे ऑडिट होत नाही. मागील ३ वर्षांपासून रेल्वे सेवा कुर्ला आणि सायन दरम्यान ठप्प होते. ३१ मेपर्यंत मोरी साफ करून सर्वेक्षण केल्यास अशी परिस्थिती उद्भवणार नाही, असे सांगत गलगली यांनी दोन्ही एजन्सी तितक्याच जबाबदार असल्याचे सांगितले.