रेल्वेत फेरीवाल्यांची ‘दादागिरी’
By admin | Published: December 28, 2016 03:47 AM2016-12-28T03:47:51+5:302016-12-28T03:47:51+5:30
मुंबई उपनगरीय रेल्वे हद्दीत मोठ्या प्रमाणात फेरीवाल्यांचा वावर वाढला असून, त्यांच्याकडून रेल्वेच्या नियमाला आणि कायद्यालाच तिलांजली देण्यात येत आहे. नुकत्याच मध्य
मुंबई : मुंबई उपनगरीय रेल्वे हद्दीत मोठ्या प्रमाणात फेरीवाल्यांचा वावर वाढला असून, त्यांच्याकडून रेल्वेच्या नियमाला आणि कायद्यालाच तिलांजली देण्यात येत आहे. नुकत्याच मध्य रेल्वेवर घडलेल्या तीन घटनांमुळे रेल्वे प्रवाशांच्या सुरक्षेबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. मध्य रेल्वेवर दोन वर्षांत फेरीवाल्यांवर झालेल्या कारवाईचा आकडा पाहिल्यास, ३५ हजार ८१७ केसेसची नोंदणी झाली आहे.
कल्याण ते कसारादरम्यान पाटलीपुत्र एक्स्प्रेसवर सात जणांनी दरोडा घातला होता. यात सहभागी सातपैकी सहा जणांना लोहमार्ग पोलिसांकडून अटक करण्यात आली. अटकेत असलेले सर्व आरोपी हे रेल्वे हद्दीत काम करणारे फेरीवाले असल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली. पाटलीपुत्र एक्स्प्रेसवरील दरोड्यापूर्वीही दोन मोठ्या घटनाही मध्य रेल्वे मार्गावर घडल्या आहेत. यात ठाणे स्थानकात एका प्रवासी आणि फेरीवाल्यांमध्ये वाद झाला होता. यात सहा ते सात फेरीवाल्यांकडून मारहाणीच्या भीतीने, या प्रवाशाने पळ काढण्यासाठी रेल्वे रुळावरच उडी टाकली. त्यावेळी येणाऱ्या लोकलची धडक प्रवाशाला लागली आणि त्यात त्याला जीव गमवावा लागला. ही घटना सीसीटीव्हीतही कैद झाली. या घटनेनंतर कुर्ला स्थानकात एका महिला प्रवाशाच्या गळ्यातील सोनसाखळी खेचून आरोपीने महिलेला लोकलसमोरच ढकलले. यात महिलेला जीव गमवावा लागला. यातील आरोपी कुर्ला स्थानकातीलच प्रसाधनगृहात काम करत असल्याची माहिती समोर आली. एकंदरीतच या घटना पाहिल्यास, आरपीएफकडून फेरीवाल्यांवरील कारवाई व लोहमार्ग पोलिसांकडून रेल्वेत कंत्रादाराकडून ठेवण्यात येत असलेल्या कर्मचाऱ्यांवर वचकच नसल्याचे दिसते. (प्रतिनिधी)
फेरीवाल्यांवर कठोर कारवाई करण्याची मागणी आमच्याकडून आरपीएफकडे नेहमी केली जाते. त्याचप्रमाणे, रेल्वेत कंत्राटदारांचे कर्मचारी कामासाठी ठेवण्यात येतात. त्यांची पोलीस पडताळणी झाली पाहिजे व या कामात मदत करावी, अशी मागणी आरपीएफकडे करण्यात आली आहे.
- निकेत कौशिक, पोलीस आयुक्त-लोहमार्ग.
आरपीएफकडून फेरीवाल्यांवर नेहमी कारवाई केली जाते. या कारवाईचा आकडा पाहिल्यास तो खूप मोठा आहे. २0१६ मध्ये १९ हजार ७३३ केसेसची नोंद झाली आहे.
- सचिन भालोदे, वरिष्ठ विभागीय सुरक्षा आयुक्त, मध्य रेल्वे आरपीएफ.