Join us

जग थांबले असताना रेल्वेने सुट्टी घेतली नाही; रेल्वेमंत्र्यांकडून कर्मचाऱ्यांचे कौतुक

By ऑनलाइन लोकमत | Published: April 07, 2021 2:40 AM

मुंबई : देशभर पसरलेल्या कोविड-१९ मुळे सर्व जग जणू थांबलेले असताना, रेल्वेने कधी एक दिवसही सुट्टी घेतली नाही आणि ...

मुंबई : देशभर पसरलेल्या कोविड-१९ मुळे सर्व जग जणू थांबलेले असताना, रेल्वेने कधी एक दिवसही सुट्टी घेतली नाही आणि अर्थव्यवस्थेच्या चाकांना गतिमान ठेवण्यासाठी मोठ्या जोखमीने अधिक कठोर परिश्रम घेतले.  तुमच्या वचनबद्धतेमुळेच आपण वीज प्रकल्पांसाठी कोळसा, शेतकऱ्यांसाठी खत किंवा देशभरातील ग्राहकांसाठी धान्य अशा सर्व आवश्यक वस्तूंचा अखंडित पुरवठा सुनिश्चित केला. काेराेना विरोधातील लढाईत आपल्या निस्वार्थ योगदानास देश नेहमीच स्मरणात ठेवेल. आपल्या तीव्र इच्छाशक्ती आणि संकटातून लवकर बाहेर पडण्याच्या क्षमतेमुळे आपण या संकटाला संधीत बदलले, असे म्हणत रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांनी प्रतिकूल परिस्थितीत मागील आर्थिक वर्षात केलेल्या कामगिरीबद्दल रेल्वे कर्मचाऱ्यांचे कौतुक केले.रेल्वे कर्मचाऱ्यांना लिहिलेल्या पत्रात रेल्वेमंत्र्यांनी म्हटले आहे की, आपले धैर्य, दृढनिश्चय आणि संकल्प यामुळेच आपण या साथीच्या आजारातही विजयी झालो आहोत. १,२३३ दशलक्ष टन एवढी मूळ मालवाहतूक लोडिंग ही मागील कोणत्याही वर्षापेक्षा सर्वात जास्त आहे. रेल्वेने केलेले कार्य अतुलनीय असून, यामुळे आर्थिक पुनर्प्राप्तीची दिशा मिळण्यास मदत झाली. गेल्या आर्थिक वर्षात ६,०१५ आर. के. एम. एवढे रेल्वेचे विद्युतीकरण पार पडले. रेल्वे प्रवासी केंद्रित आणि वेग वाढविण्यासाठी तसेच परिचालन क्षमता सुधारण्यासाठी असंख्य पावले उचलत आहे. याची प्रचितीही यातून दिसते, की मालगाड्यांचा सरासरी वेग जवळपास दुप्पट म्हणजेच ४४ किमी प्रतितास झाला असून, प्रवासी गाड्यांचा वक्तशीरपणा ९६ टक्के पातळीवर कायम ठेवण्यात आला आहे. नागरिकांच्या मदतीला धावल्या ४,६२१ श्रमिक विशेष गाड्याकुटुंबांना एकत्र करण्यासाठी आणि ६३ लाखांहून अधिक अडकलेल्या नागरिकांना घेऊन जाण्यासाठी ४,६२१ श्रमिक विशेष गाड्या चालविण्यात आल्या. लॉकडाऊनदरम्यान मर्यादा असूनही, सुरक्षा आणि पायाभूत सुविधांची ३७० मोठी कामे पूर्ण करण्यात आली. किसान रेल सेवाही आपल्या अन्नदात्यांस थेट मोठ्या बाजारांशी जोडण्याचे माध्यम बनली. आपण आपली अविरत सेवा देऊन हे शक्य केले आणि लाखो लोकांची मने जिंकली. 

टॅग्स :कोरोना वायरस बातम्यापीयुष गोयलभारतीय रेल्वे