कोरोनाच्या काळात रेल्वेची ३०८ कोटीची कमाई
By ऑनलाइन लोकमत | Published: April 28, 2020 06:21 PM2020-04-28T18:21:25+5:302020-04-28T18:25:11+5:30
देशाला रेल्वे पुरवतेय जीवनावश्यक सामग्री; कोरोनाच्या युद्धात रेल्वे प्रशासनाचा मोलाचा वाटा
कुलदीप घायवट
मुंबई : लॉकडाऊनच्या काळात देशातील कानाकोपऱ्यातून जीवनावश्यक सामग्रीसह सिमेंट, इंधन यांची वाहतूक सुरु आहे. यातून रेल्वेची ३०८ कोटींची कमाई केली आहे.
मागील एका महिन्यात मध्य रेल्वेने ७० हजार ३७४ वॅगनमधून जीवनावश्यक वस्तूंची वाहतूक केली. मध्य रेल्वेच्या मुंबई, नागपूर, भुसावळ, सोलापूर आणि पुणे विभागातून दररोज लोडिंग/ अनलोडिंगसाठी विविध टर्मिनसवर सुमारे ७५ रॅक मालगाड्या येतात. २४/७ हे काम सुरु असते. त्यामुळे २३ मार्चपासून ते २२ एप्रिलपर्यंत १ हजार ४१५ मालगाड्यामधून ७० हजार ३७४ वॅगनची वाहतूक करणे मध्य रेल्वेने शक्य केले आहे. यातून मध्य रेल्वेने ३०८ कोटी ७४ लाखांची कमाई केली आहे.
मध्य रेल्वेच्या मुंबई, नागपूर, भुसावळ, सोलापूर आणि पुणे विभागात २५२ वॅगनमध्ये धान्य, ४८४ वॅगनमध्ये साखर, ३४ हजार ४९७ वॅगनमध्ये कोळसा, २५ हजार ३८० वॅगन्समध्ये कंटेनर, ५ हजार १८३ वॅगन्समध्ये पेट्रोलियम उत्पादने, १ हजार ८०२ वॅगनमध्ये खते, ६३५ वॅगन्समध्ये स्टील, २५२ वॅगन्समध्ये डि-ऑईल केक आणि ११७ वॅगनमध्ये सिमेंट व १ हजार ७७२ वॅगनमध्ये विविध वस्तू भरल्या गेल्या. मध्य रेल्वेने सुमारे २२० पार्सल गाड्या वेळापत्रकानुसार चालविल्या जात आहेत. कोरोना विरुद्ध आमची लढाई सुरु आहे, अशी माहिती मध्य रेल्वे प्रशासनाने दिली.
----------------------------------
नागपूरची संत्र्यांच्या २ हजार ४० पेट्यांची वाहतूक
मध्य रेल्वेच्या नागपूर विभागाने मागील एका महिन्यात नागपूरची संत्री देशभरात पाठवली आहे. राऊरकेला आणि टाटानगर येथे ३९ टन वजनाच्या २ हजार ४० पेट्या पाठवण्यात आल्या आहेत. याशिवाय पार्सल गाड्यांमध्ये कोलकाता, गुवाहाटी, सिकंदराबाद, चेन्नई, झारसुगुडा येथे संत्र्यांची पाकिटे, २१६ टन औषधे आणि इतर वैद्यकीय उपकरणांची वाहतूक केली आली.
----------------------------------
हापूस आंबा देशभरात
कोकण रेल्वे मार्गावरून तिरुअनंतपुरम ते ओखा या पार्सल गाडीतून हापूस आंब्याची वाहतूक केली आहे. विशेष पार्सल गाडीतून सुमारे ४८ आंब्याच्या पेट्याची वाहतूक केली. तर केरळमधून आलेल्या ३ टन केळीचे वेफर्सची देखील वाहतूक केली आहे.
----------------------------------
- कोरोनामुळे देशातील सर्व वाहतुकीसह प्रवासी रेल्वे वाहतूक सेवा बंद आहे. फक्त पार्सल, मालगाडी सुरु आहे. दूध, धान्य, औषधे, वैद्यकीय उपकरणे, फळे, भाज्या, मासे, अंडी, बियाणे, टपाल पिशव्या, कच्चा माल, इंधन, सिमेंट यासारख्या जीवनावश्यक सामग्रीची वाहतूक केली जात आहे.
- मध्य, पश्चिम, कोकण रेल्वे मार्गावरून जीवनावश्यक सामग्रीचा पुरवठा कमी पडू नये, यासाठी रेल्वे प्रशासनाने मालगाडी, पार्सल गाडीच्या वेळेचे नियोजन केले आहे. या कामगिरीमुळे रेल्वे प्रशासन कोरोनाच्या युद्धात मोलाचे योगदान देत आहे.
----------------------------------
भारतीय रेल्वे संकट काळात खूप जबाबदारीने आणि संवेदनशीलपणे काम करत आहे.देशाचा विविध भागात मालवाहतूक करण्यासाठी २४ x ७ काम करत आहे.
- शिवाजी सुतार, मुख्य जनसंपर्क अधिकारी, मध्य रेल्वे
पश्चिम रेल्वेने २३ मार्च ते २५ एप्रिल या लॉकडाऊनच्या काळात १९ हजार टन जीवनावश्यक सामग्रीची वाहतूक देशभरात केली. यामध्ये ११ हजार टन दुधाची वाहतुक झाली आहे. जीवनावश्यक वस्तूची वाहतूक करण्यासाठी विशेष मालगाडी, पार्सल गाडी सुरु असल्याने पश्चिम रेल्वेला ५ कोटी ६५ लाख रुपयांचा महसूल मिळाला आहे.
- रवींद्र भाकर, मुख्य जनसंपर्क अधिकारी, पश्चिम रेल्वे