प.रे.ची ‘हार्बर वाहतूक सेवा’ मध्य रेल्वेकडे ?
By Admin | Published: August 30, 2016 03:25 AM2016-08-30T03:25:57+5:302016-08-30T03:25:57+5:30
पश्चिम रेल्वेच्या अखत्यारित येणारी हार्बरची वाहतूक व्यवस्था पूर्णत: मध्य रेल्वेकडे सोपविण्याचा प्रस्ताव तयार करण्यात आला आहे.
मुंबई : पश्चिम रेल्वेच्या अखत्यारित येणारी हार्बरची वाहतूक व्यवस्था पूर्णत: मध्य रेल्वेकडे सोपविण्याचा प्रस्ताव तयार करण्यात आला आहे. हा प्रस्ताव आॅगस्टच्या पहिल्याच आठवड्यात पाठविण्यात आला असून संपूर्ण हार्बर सेवा मध्य रेल्वेच्या अखत्यारित येईल आणि त्यावर नियंत्रणही राहिल, असे एका वरिष्ठ अधिकाऱ्याकडून सांगण्यात आले.
मध्य रेल्वेच्या सीएसटी हार्बरवरुन पश्चिम रेल्वेच्या अंधेरीपर्यंतही लोकल धावते. त्यामुळे मध्यकडे कामानिमित्त असणाऱ्या प्रवाशांना सीएसटी ते अंधेरी हार्बर सेवा सोयिस्कर पडते. यात माहिमपासून पुढील स्थानके ही पश्चिम रेल्वेच्या अखत्यारित येतात. त्यामुळे एखादी समस्या उद्भवल्यास पश्चिम व मध्य रेल्वेचा पुर्ता गोंधळ उडतो. हे पाहता हार्बरची थेट अंधेरीपर्यंतची सेवा मध्य रेल्वेच्या ताफ्यात दाखल करण्याचा प्रस्ताव तयार करण्यात आला आहे. त्यामुळे या मार्गावरील वाहतुकीचे नियोजन करण्यास मध्य रेल्वेला सोप्पे जाईल, असेही अधिकाऱ्याकडून स्पष्ट करण्यात आले.