कुठे पाच वर्षांत ११७१ कोटी रु., कुठे एका वर्षात १५९४० कोटी; रेल्वेने महाराष्ट्राला दिला भरभरून निधी : वैष्णव
By ऑनलाइन लोकमत | Published: November 10, 2024 11:31 AM2024-11-10T11:31:23+5:302024-11-10T11:31:42+5:30
रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी ‘लोकमत’शी बोलताना रेल्वे खात्याने महाराष्ट्राला किती भरभरून दिले आहे, याचा लेखाजोखा मांडला.
लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई : केंद्रात २००९ ते २०१४ मध्ये काँग्रेस प्रणित युपीएचे सरकार होते तेव्हा त्या पाच वर्षांत रेल्वे खात्याची महाराष्ट्रासाठीची तरतूद होती ११७१ कोटी रुपये आणि आता नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वातील सरकारमध्ये रेल्वे खात्याची २०२४-२५ मध्ये महाराष्ट्रासाठी तरतूद आहे, १५९४० कोटी रुपये. रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी ‘लोकमत’शी बोलताना रेल्वे खात्याने महाराष्ट्राला किती भरभरून दिले आहे, याचा लेखाजोखा मांडला.
मुंबई आणि एमएमआर क्षेत्राच्या रेल्वेसेवेचा चेहरामोहरा पूर्णत: बदलेल, असे प्रकल्प हाती घेण्यात आले आहेत. ते १६२४० कोटी रुपये खर्चाचे आहेत. बरेच काम पूर्ण झाले आहे. हे प्रकल्प कधी पूर्ण होणार, याची डेडलाइनही अश्विनी वैष्णव यांनी सांगितली. सीएसएमटी-कुर्ला पाचवी आणि सहावी मार्गिका, मुंबई सेंट्रल-बोरीवली, गोरेगाव-बोरीवली हार्बर लाइनचा विस्तार, विरार-डहाणू रोड तिसरी व चौथी मार्गिका, पनवेल-कर्जत सबर्बन कॉरिडॉर, ऐरोली-कळवा सबर्बन कॉरिडॉर, कल्याण-आसनगाव चौथी मार्गिका, कल्याण-बदलापूर तिसरी व चौथी मार्गिका, कल्याण-कसारा तिसरी मार्गिका, नायगाव-जुईचंद्र डबल लाइन, निळाजे-कोपर डबल लाइन या प्रकल्पांचा त्यात समावेश आहे.
गणेशोत्सवात विशेष गाड्या
गणेशोत्सवाच्या काळात २०२३ मध्ये ३०५ विशेष रेल्वे सोडण्यात आल्या होत्या. यंदा ३४२ विशेष गाड्या सोडण्यात आल्या, अशी माहिती अश्विनी वैष्णव यांनी यावेळी दिली. अश्विनी वैष्णव हे विधानसभा निवडणुकीसाठी भाजपाचे महाराष्ट्रासाठीचे सहप्रभारी आहेत. केंद्रीय मंत्री आणि प्रभारी भूपेंद्र यादव आणि ते दोन महिन्यांपासून महाराष्ट्रात तळ ठोकून आहेत.
महाराष्ट्रात १ लाख ६४ हजार कोटी रुपये खर्चाची विविध कामे सुरू
सध्या महाराष्ट्रात रेल्वेेकडून १ लाख ६४ हजार ६०५ कोटी रुपये खर्चाची विविध कामे केली जात आहेत. त्यात चालू प्रकल्प - ८१५८० कोटी रु., अमृत स्थानकांची उभारणी - ६४११ कोटी रु., रेल्वे फ्लायओव्हर आणि अंडरब्रिज ५६१५ कोटी रु., बुलेट ट्रेन - ३३१६० कोटी रु., डेडिकेटड फ्रेट कॉरिडॉर १२६९७ कोटी, जालना ते जळगाव नवीन १७४ किमी रेल्वेमार्गाची उभारणी ७१०६ कोटी रु., मनमाड-इंदूर नवीन रेल्वेमार्ग १८०३६ कोटी रु. या प्रकल्पांचा त्यात समावेश आहे.