मुंबई : लोकल अपघात कमी करण्यासाठी रेल्वे प्रशासनाकडून सर्वोतोपरी प्रयत्न केले जात असतानाच अपघात मात्र काही कमी होताना दिसत नाहीत. २0१४ मध्ये अवघ्या दहा महिन्यांत विविध अपघातांत २,८९0 प्रवाशांचा बळी गेला आहे. यामध्ये रेल्वे रूळ ओलांडताना १,६0६ आणि गाडीतून पडून ६८0 प्रवाशांचा मृत्यू झाल्याचे रेल्वे पोलिसांनी दिलेल्या माहितीत उघड झाले आहे. रेल्वरच्या तिन्ही मार्गांवर जवळपास ७५ लाख प्रवासी प्रवास करतात. मात्र गेल्या काही वर्षांत वाढलेली प्रवाशांची संख्या आणि अपुऱ्या पडत चाललेल्या सोयी-सुविधा पाहता रेल्वे प्रशासनाने आता हात टेकले आहेत. गेल्या काही वर्षांत प्रवाशांना मोठ्या प्रमाणात लोकल अपघातांना सामोरे जावे लागत असून हे अपघात कमी करण्यासाठीही रेल्वेकडून प्रयत्न केले जात आहेत. मात्र हे प्रयत्न करूनही अपघात कमी होताना दिसत नाहीत. २0१४ मध्ये जानेवारी ते आॅक्टोबरपर्यंत २ हजार ८९0 प्रवाशांचे बळी गेले आहेत. यामध्ये सर्वाधिक बळी रेल्वे रूळ ओलांडताना असून त्यामध्ये १ हजार ६0६ जणांना आपला जीव गमवावा लागला आहे. त्याखालोखाल धावत्या लोकलमधून पडूनही ६८0 प्रवासी ठार झाले आहेत.महत्त्वाची बाब म्हणजे गर्दीच्या वेळेत सर्वाधिक प्रवाशांना आपला जीव गमवावा लागल्याचे रेल्वे पोलीस सांगतात. त्यानंतर गॅपमध्ये पडून, खांबाला आदळून, ओव्हरहेड वायरचा शॉक लागून, आत्महत्या, नैसर्गिक आजाराने आणि अन्य कारणांनीही अपघात झाले आहेत. २0१३ मध्ये विविध अपघातांत ३ हजार ५0६ प्रवाशांना आपला जीव गमवावा लागला होता, असे सांगण्यात आले. (प्रतिनिधी)
रेल्वेत १० महिन्यांत २,८९0 बळी
By admin | Published: November 20, 2014 1:09 AM