मुंबई : मध्य आणि पश्चिम रेल्वे मार्गावर प्रवाशांच्या सेवेसाठी बसविण्यात आलेले सरकते जिने अधिकवेळा तांत्रिक कारणांनी बंद असतानाच आता मध्य आणि पश्चिम रेल्वेकडून एका सरकत्या जिन्यांवर वर्षाला देखभालीसाठी अनुक्रमे २.९७ आणि १.८५ लाख रुपये खर्च केले जात असल्याचे समोर आले आहे.
पश्चिम रेल्वेचे वरिष्ठ विभागीय विद्युत अभियंता शकील अहमद यांनी माहिती अधिकारी अनिल गलगली यांना माहिती अधिकारांतर्गत दिलेल्या माहितीनुसार, चर्चगेट ते विरार या दरम्यान १०६ सरकते जिने आहेत.
एका सरकत्या जिन्यांचा प्रतिवर्ष देखभाल खर्च १.८५ लाख आहे. तर मध्य रेल्वेचे वरिष्ठ विभागीय विद्युत अभियंता एच. एस. सूद यांनी दिलेल्या माहितीनुसार, सीएसएमटी ते कल्याण आणि सीएसएमटी ते वाशीदरम्यान १०१ सरकते जिने आहेत. एका सरकत्या जिन्यांचा प्रतिवर्ष देखभाल खर्च २.९७ लाख आहे.
एका वर्षात सरकते जिने १ हजार ८२५ वेळा बंद पडल्याचेही पश्चिम रेल्वेने म्हटले आहे. अज्ञात व्यक्तीकडून आपत्कालीन बटण दाबले गेल्यानंतर सरकते जिने बंद होण्याचे प्रमाण ९५ टक्के आहे. मध्य रेल्वेकडे मात्र सरकते जिने कितीवेळा बंद पडले ही माहिती उपलब्ध नाही.