पावसाळ्यात रेल्वे रुळावर पाणी साचू नये, भर पावसाळ्यातही रेल्वे गाड्या विनाव्यत्यय चालाव्यात म्हणून दरवर्षी मध्य आणि पश्चिम रेल्वेकडून पावसाळ्याच्या तोंडावर मान्सूनपूर्व कामे केली जातात. यावर कोट्यवधी रुपयांचा खर्चही रेल्वेकडून केला जातो. मात्र, दरवर्षी... नेमेचि येतो मग पावसाळा... अशी स्थिती होते. रेल्वे रुळावर पाणी साचून उपनगरीय सेवा विस्कळीत होते. ७५ लाख मुंबईकरांना याचा फटका बसतो.
गेल्या दोन आठवड्यांत मुंबई, ठाणे, नवी मुंबई या शहरांना पावसाने चांगलेच झोडपून काढले. १९ जुलैला मुसळधार पावसाने मुंबईतील अनेक स्टेशनमध्ये पाणी भरल्याने मध्य रेल्वेच्या १०० पेक्षा जास्त लोकल फेऱ्या तसेच लांब पल्ल्याच्या मेल-एक्स्प्रेस रेल्वे गाड्या रद्द कराव्या लागल्या. २१ जुलै रोजी पावसामुळे हार्बर मार्गावरील कुर्ला स्थानकात पाणी तुंबल्याने हार्बर मार्गावरील २० लोकल फेऱ्या रद्द कराव्या लागल्या, तर २२ जुलै रोजी कल्याण रेल्वे स्थानकादरम्यान रेल्वे रुळावर पाणी साचल्याने मुख्य मार्गावरील लोकल सेवा ४० ते ४५ मिनिटे विलंबाने असल्याने लोकलचे वेळापत्रक पार कोलमडले.
रविवारी पश्चिम रेल्वेच्या बोरीवली स्थानकात लोकलच्या पेंटाग्राफमध्ये तांत्रिक बिघाडामुळे लोकल वाहतूक विस्कळीत झाली होती. २७ जुलैला रेड अलर्ट होता, त्या दिवशी लोकल २० ते २५ मिनिटे उशिराने सुरू होत्या. २८ जुलैला मुंबई रेल्वे विकास महामंडळामार्फत विरार-डहाणू रोड चौपदरीकरण प्रकल्पाचे काम विरार स्थानकात सुरू आहे. तेथे खोदकाम करताना १२ सिग्नल बंद झाले व त्याचा फटका विरारकरांना आणि विरार ते डहाणू रोड दरम्यान प्रवास करणाऱ्या रेल्वे प्रवाशांना बसला. रेल्वेचे सातत्याने होत असलेले हे बिघाड पाहता, त्यातून सुयोग्य धडा घेत रेल्वे प्रशासनाने व संबंधितांनी कामे नीट व धडपणे करण्याची गरज आहे.