महिलांच्या सुरक्षेसाठी रेल्वेचा ‘तिसरा डोळा’; कोचमध्ये २४ तास नजर
By सचिन लुंगसे | Published: February 6, 2024 12:40 PM2024-02-06T12:40:57+5:302024-02-06T12:41:10+5:30
लोकलच्या ४२१ तर मेल-एक्स्प्रेसच्या १७६२ डब्यांत २४ तास नजर
सचिन लुंगसे
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : मुंबईच्या उपनगरीय रेल्वे गाड्यांसह एक्स्प्रेसमधून रात्री - अपरात्री प्रवास करणाऱ्या महिला प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न नेहमीच ऐरणीवर असतो. परंतु या महिला प्रवाशांचा प्रवास सुरक्षित व्हावा यासाठी मध्य रेल्वे व्यापक प्रयत्न करत असून, मध्य रेल्वेवरील उपनगरीय ट्रेनच्या ४२१ महिला डब्यांमध्ये आणि मेल, एक्स्प्रेस ट्रेनच्या १७६२ डब्यांमध्ये सीसीटीव्ही कॅमेऱ्यांद्वारे २४ तास नजर ठेवली जात आहे.
रेल्वे प्रवाशांच्या सुविधा वाढवणे आणि रेल्वे स्थानकांना आधुनिक करण्याच्या हेतूने १८ स्थानके निवडण्यात आली आहेत. त्यापैकी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, नागपूर आणि अजनी स्थानकांवरील कामे वेगात सुरू आहेत. पुढील दोन वर्षांत ती पूर्ण होण्याची अपेक्षा आहे. या व्यतिरिक्त पंतप्रधानांनी सुरू केलेल्या अमृत भारत योजनेच्या अंतर्गत उत्तम प्रवासी सुविधा देण्यासाठी ७६ स्थानके अमृत स्टेशन म्हणून निवडली आहेत आणि या सर्व स्थानकांवर पुनर्विकासाचे काम सुरू आहे. नुकतीच मुंबई ते जालना वंदे भारत ट्रेन सुरू झाली असून, इंदूर - भोपाळ ट्रेनचा विस्तार नागपूरपर्यंत केला आहे. भारताचा समृद्ध सांस्कृतिक आणि धार्मिक वारसा दाखवण्यासाठी आणि पर्यटन क्षेत्रात नवीन सेवा आणण्यासाठी, आईआरसीटीसीद्वारे मध्य रेल्वेच्या समन्वयाने २१ भारत गौरव गाड्या चालवल्या जात आहेत, असेही राम करण यादव यांनी सांगितले.
उपनगरीय गाड्यांच्या ५१२ महिला डब्यांमध्ये इमर्जन्सी टॉक बॅक सिस्टीम देण्यात आली असून, मध्य रेल्वेवरून विशेषत: रात्री जाणाऱ्या १०९ मेल/एक्स्प्रेस गाड्या आरपीएफद्वारे एस्कॉर्ट केल्या जात आहेत. एक्स्प्रेसमध्ये अशी सुरक्षा बाळगली जात आहे. यामुळे गुन्हेगारीच्या घटना कमी करण्यात यश आले आहे.
- राम करण यादव,
महाव्यवस्थापक, मध्य रेल्वे
सेवांचा विस्तार
मध्य रेल्वे १८१० सेवांसह मुंबईतील सर्वात व्यस्त उपनगरीय प्रणालींपैकी एक चालवते. ज्यात ६६ वातानुकूलित सेवांचा समावेश आहे.
आता खारकोपर-उरण विभागात उपनगरीय सेवांचा विस्तार करण्यात आला असून, ठाणे आणि ऐरोली स्थानकांदरम्यान नवीन दिघा गाव स्थानक सुरू करण्यात आले आहे.