मुंबई : मुंबई सेंट्रल-दिल्ली मार्गावर मार्च २०२४ पर्यंत स्वदेशी कवच तंत्रज्ञान बसविण्यात येणार आहे. भारतीय रेल्वेच्या हायस्पीड आणि हायडेन्सिटी रेल्वे नेटवर्कवर सुरक्षितता निश्चित करण्यासाठी ‘ट्रेन कोलिजन अवॉयडन्स सिस्टीम’ची अंमलबजावणी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. हा प्रकल्प चार टप्प्यांत पूर्ण करण्यात येणार आहे. त्यामुळे मेल-एक्स्प्रेसचा प्रवास अधिक सुरक्षित होईल.
फेब्रुवारी २०१६ पासून मेल-एक्स्प्रेस गाड्यांवर कवचची चाचणी सुरू झाली. कवचचा पुरवठा करण्यासाठी २०१८-१९ मध्ये तीन कंपन्यांची निवड करण्यात आली. त्यानंतर जुलै २०२०मध्ये कवच प्रणालीला अधिकृतपणे राष्ट्रीय-टीपी प्रणाली म्हणून स्वीकारण्यात आले.
रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांच्या उपस्थितीत मार्च २०२२ मध्ये सिकंदराबाद येथे कार्यप्रणालीची चाचणी करण्यात आली. चाचणी यशस्वी झाल्यानंतर कार्यप्रणालीची भारतीय रेल्वेत अंमलबजावणी करण्याचा निर्णय घेण्यात आला होता.
गाड्यांमधील टक्कर टळणार
रेल्वेच्या रिसर्च डिझाइन ॲण्ड स्टँडर्ड ऑर्गनायझेशनने (आरडीएसओ) विकसित केलेली कवच संरक्षण प्रणाली स्वदेशी आहे. लोको पायलट वेगमर्यादेनुसार मेल-एक्स्प्रेस गाड्यांवर नियंत्रण ठेवू शकला नाही, तर कवच प्रणाली कार्यरत होऊन रेल्वे गाडीतील ब्रेक यंत्रणा सक्रिय होऊन तत्काळ गाडी थांबते.
दक्षिण मध्य रेल्वेवर इलेक्ट्रिक मल्टिपल युनिट रेकसह १४६५ किलोमीटर्स आणि १२१ लोकोमोटिव्हवर कवच प्रणाली राबविली आहे. देशातील आणखी ६ हजार किलोमीटर रेल्वेमार्गांवर कवच प्रणाली कार्यान्वित केली जाणार आहे. रेल्वे सध्या तपशीलवार प्रकल्प अहवाल तयार करीत आहे.