Join us  

पावसामुळे रेल्वे रडकुंडीला, 200 पेक्षा जास्त लोकल रद्द; रेल्वेच्या मान्सून तयारीचेही वाजले तीनतेरा

By ऑनलाइन लोकमत | Published: July 25, 2023 6:16 AM

मुंबई उपनगरात बुधवारपासून कोसळणाऱ्या पावसाने रविवारी उसंत घेतली; मात्र गेल्या चार दिवसांत रेल्वे वाहतुकीचे तीनतेरा वाजले आहेत.

मुंबई : मुंबई उपनगरात बुधवारपासून कोसळणाऱ्या पावसाने रविवारी उसंत घेतली; मात्र गेल्या चार दिवसांत रेल्वे वाहतुकीचे तीनतेरा वाजले आहेत. यामुळे रेल्वेवर गेल्या पाच दिवसांत २०० पेक्षा जास्त लोकल फेऱ्या रद्द करण्याची नामुष्की आली तसेच अडीच हजारांपेक्षा जास्त  लोकल फेऱ्यांना लेटमार्क बसला. त्यामुळे मुंबईकरांचे गेल्या काही  दिवसांत चांगलेच हाल झाले आहेत.

पावसाळ्यात रेल्वे रुळावर पाणी साचून नये, रेल्वे गाड्यांचा वक्तशीरपणा पाळला जावा, यासाठी दरवर्षी मध्य-पश्चिम रेल्वेकडून मान्सूनपूर्व कामे केली जातात. यावर कोट्यवधींचा खर्चही केला जातो; मात्र प्रत्येक वर्षी पावसाळ्यात रेल्वे रुळावर पाणी साचून लोकल वाहतूक विस्कळीत होते.बुधवारी रात्रीपासून सुरू झालेल्या पावसाने शनिवार, रविवारी रात्रीपर्यंत मुंबई, ठाणे, नवी मुंबई या शहरांना झोडपून काढले. बुधवारी झालेल्या मुसळधार पावसामुळे लोकलची वाहतूक विस्कळीत झाली. अनेक रेल्वेस्थानकांमध्ये पाणी भरल्याने मध्य रेल्वेने कल्याण-कर्जत-कसारा लोकल सेवा बंद केली. त्यामुळे दिवसभर मध्य रेल्वेला १०० पेक्षा जास्त लोकल फेऱ्या रद्द कराव्या लागल्या. लांब पल्ल्याच्या मेल-एक्स्प्रेस रेल्वे गाड्या पावसामुळे रद्द कराव्या लागल्या.

शुक्रवारी पावसामुळे हार्बर मार्गावरील कुर्ला स्थानकात पाणी तुंबल्याची स्थिती निर्माण झाली. त्यामुळे सुरक्षेच्या कारणास्तव वडाळ्याहून  मानखुर्दच्या दिशेने जाणारी डाऊन मार्गावरची वाहतूक दुपारी अर्ध्या तासासाठी थांबवली. त्यामुळे हार्बर मार्गावरील २० लोकल फेऱ्या रद्द कराव्या लागल्या. 

शनिवारी कल्याण रेल्वेस्थानकादरम्यान रेल्वे रुळावर पाणी साचल्याने मुख्य मार्गावरील लोकल सेवा ४० ते ४५ मिनिटे विलंबाने धावत असल्याने लोकलचे वेळापत्रक कोलमडले होते. रविवारी पश्चिम रेल्वेच्या बोरीवली स्थानकात लोकलच्या पेंटाग्राफमध्ये तांत्रिक बिघाडामुळे लोकल वाहतूक विस्कळीत झाली. गेल्या पाच दिवसांत विविध ठिकाणी सिग्नल यंत्रणेत बिघाड झाल्याने लोकल वाहतुकीवर परिणाम झाला. पावसामुळे मध्य आणि पश्चिम रेल्वेवरील साधारण गेल्या पाच दिवसांत २०० पेक्षा जास्त लोकल फेऱ्या रद्द केल्या, तर अडीच हजारांपेक्षा जास्त लोकल फेऱ्यांना ‘लेटमार्क’ लागला.

पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर रेल्वे प्रशासनाने पूर्वतयारी करणे आवश्यक होते. ती दिसून येत नाही. अनेक स्थानकात गळती सुरू आहे. रेल्वे रुळात पाणी साचते. लोकल वेळेवर धावत नाही. त्यामुळे पावसाळ्यात प्रवाशांची फलाटावर मोठी गर्दी होते. वेळीच उपाययोजना केल्या नाहीत तर अपघाताचा धोका आहे.- नंदकुमार देशमुख, अध्यक्ष, ठाणे रेल्वे प्रवासी संस्था

टॅग्स :रेल्वे