रेल्वेने पार्सल गाड्यांची वाहतूक करून 3 कोटी 8 लाखांची कमाई
By ऑनलाइन लोकमत | Published: April 20, 2020 07:05 PM2020-04-20T19:05:53+5:302020-04-20T19:06:22+5:30
पश्चिम रेल्वे प्रशासन कमाईत अव्वल
मुंबई : लॉकडाऊनमुळे देशभरात प्रवासी रेल्वे वाहतूक बंद आहे. त्यामुळे रेल्वे विभागाचे आर्थिक गणित बिघडले आहे. मात्र जीवनावश्यक वस्तूची वाहतूक करण्यासाठी विशेष मालगाडी, पार्सल गाडी सुरु असल्याने ८ ते १७ एप्रिल या कालावधीत देशभरातील रेल्वेने पार्सल गाड्यांची वाहतूक करून 3 कोटी 8 लाख रुपये कमावले आहेत. यामधील १ कोटी ५९ लाखांचा वाटा पश्चिम रेल्वेचा आहे. त्यामुळे देशातील सर्व रेल्वे विभागातून पश्चिम रेल्वे अव्वल ठरली आहे.
भारतीय रेल्वे मार्गावर फक्त मालगाडी आणि पार्सल गाडी धावत आहे. यांच्याद्वारे देशभरातील नागरिकांना दुध, धान्य, इंधन यासारख्या जीवनावश्यक वस्तू आणि औषधांचा पुरवठा केला जातोय. त्यामुळे भारतीय रेल्वेने ८ ते १७ एप्रिल या कालावधीत 3 कोटी 8 लाख रुपये कमावले आहेत.
संपूर्ण भारतीय रेल्वेमध्ये पार्सल गाड्यांची वाहतूक सुरु आहे. मात्र यामध्ये देशातील सर्व विभागातून पश्चिम रेल्वेची कमाई सर्वाधिक आहे. ८ ते १७ एप्रिल या कालावधीत पश्चिम रेल्वेने १ कोटी ५९ लाख रुपये कमविले आहेत. सर्व रेल्वे विभागाच्या ४२ टक्के कमाईचा वाटा पश्चिम रेल्वेचा आहे.
पश्चिम रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी रवींद्र भाकर यांनी सांगितले कि, लॉकडाऊन काळात पश्चिम रेल्वे प्रशासनाद्वारे पार्सल गाड्यांची वाहतूक सुरु आहे. आतापर्यंत ३० लाख १७ हजार टन जीवनावश्यक सामग्रीची वाहतूक करण्यासाठी १ हजार ७२१ माल डबे वापरण्यात आले. मुंबई सेंट्रल ते फिरोजपूर, दादर ते भुज यासह अन्य भागातून पार्सल गाड्या धावत आहेत.