मुंबई : गेल्या काही दिवसांपासून गायब असलेला पाऊस पुन्हा एकदा परतला आहे. शनिवारी रात्री धो धो बरसल्यानंतर रविवारी पहाटेदेखील मान्सून मनमुराद कोसळला आहे. सकाळच्या नोंदीनुसार मुंबईत अनेक दिवसांनी ५५.८ मिलीमीटर एवढा पाऊस पडला असून, सकाळच्या पावसानंतर रविवारी मुंबई दिवसभर ढगाळ होती. सोमवारीदेखील मुंबई शहर आणि उपनगरात पावसाचा जोर किंचित राहील, अशी शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे.मुंबईतल्या पावसाच्या नोंदीनुसार, शहरात ४२, पूर्व उपनगरात ६६ आणि पश्चिम उपनगरात ६९ मिमी पाऊस कोसळला. शनिवारी रात्री आणि रविवारी पहाटे पाऊस कोसळत असतानाच २ ठिकाणे बांधकामे कोसळली. ७ ठिकाणी झाडे कोसळली. ८ ठिकाणी शॉर्टसर्किट झाले. रविवारी दिवसभर मुंबईवर पावसाचे ढग दाटून आले असले तरी पावसाचा पत्ता नव्हता. मुंबईकरांचा पुर्ण दिवस ढगाळ वातावरणात गेल्याचे चित्र होते.भारतीय हवामान शास्त्र विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार, गेल्या २४ तासांत कोकण, गोव्यात तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाची नोंद झाली. कोकण, गोव्यात ब-याच ठिकाणी तर मध्य महाराष्ट्र व विदर्भात तुरळक ठिकाणी पावसाची नोंद झाली. मराठवाड्यात हवामान कोरडे होते. तर ५ ऑक्टोबर रोजी कोकण, गोवा, मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह विजांच्या कडकडाटासह पाऊस पडेल, अशी शक्यता आहे.