मुंबई - मुंबईसह उपनगरांत मध्यरात्रीपासून जोरदार पाऊस कोसळत आहे. अनेक सखल भागात पाणी साचण्यास सुरुवात झाली आहे. ठाणे, कल्याण, डोंबिवली, वसई आणि पालघरमध्ये देखील मुसळधार पाऊस पडत आहे. मुसळधार पावसाच्या फटका हा रस्ते आणि रेल्वे वाहतुकीला बसला आहे. पावसामुळे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी पाहायला मिळत आहे. अनेक सखल भागांमध्ये पाणी साचल्यानं रस्ते वाहतुकीचा वेगदेखील मंदावला आहे. तसेच मध्य रेल्वेवरील लोकल उशिराने सुरू आहेत. याच दरम्यान कमी दाबाच्या पट्ट्यामुळे मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
बंगालच्या उपसागरापासून दक्षिण महाराष्ट्र ते उत्तर केरळ किनारपटटीलगतच्या हवामानात होत असलेल्या उल्लेखनीय बदलामुळे मुंबईसह संपुर्ण राज्यात ठिकठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार मुसळधार पावसाची नोंद होत असून, काही ठिकाणी अतिवृष्टी होत आहे. पुढील तीन दिवस हीच परिस्थिती कायम राहणार असून, मंगळवारी पालघर, ठाणे, नाशिक, पुणे, चंद्रपूर, गोंदिया आणि गडचिरोली या जिल्हयांना हवामान खात्याने रेड अलर्ट दिला आहे.
मुंबई प्रादेशिक हवामान शास्त्र विभागाचे प्रमुख डॉ. जयंता सरकार यांनी याबाबत अधिक माहिती देताना सांगितले की, गेल्या २४ तासांत कोकण, मध्य महाराष्ट्राच्या घाट परिसरात अतिमुसळधार पावसाची नोंद झाली आहे. काही ठिकाणी अतिवृष्टीची नोंद झाली आहे. पुढील तीन दिवस हीच स्थिती कायम राहण्याची शक्यता आहे. पुढील तीन दिवस कोकण किनारपटटीवर, मध्य महाराष्ट्राच्या घाट परिसरासह मराठवाड्यात मुसळधार पावसाची शक्यता आहे. एक ते दोन ठिकाणी अतिवृष्टी होईल.
९ ऑगस्ट
रेड अलर्ट - पालघर, ठाणे, नाशिक, पुणे, चंद्रपूर, गोंदिया आणि गडचिरोलीऑरेंज अलर्ट - मुंबई, ठाणे, रत्नागिरी, सातारा, कोल्हापूर, अमरावती, वर्धा, नागपूर, भंडारा
१० ऑगस्ट
ऑरेंज अलर्ट - पालघर, ठाणे, रायगड, रत्नागिरी, नाशिक, पुणे, सातारा, चंद्रपूर, गडचिरोली
११ ऑगस्ट
ऑरेंज अलर्ट - पालघर, नाशिक, अकोला, अमरावती