मुंबई : मुंबई, सांगली, सातारा, औरंगाबाद, जळगावसह राज्याच्या अनेक भागांत बुधवारी मुसळधार पाऊस झाला असून, गुरुवारी मुंबईसह रायगड, पुणे आणि सातारा जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. रात्री उशिरा पालघर, रायगड आणि ठाणे जिल्ह्यात जोरदार सरी कोसळत होत्या.हवामान खात्याच्या अंदाजानुसार मुंबईकरांना धडकी भरविणारा पाऊस आज (गुरुवारी) अतिवृष्टीसारखा कोसळण्याची शक्यता आहे.हवामानशास्त्र विभागाने रेड अलर्ट जारी केल्यानंतर मुंबई महापालिकाही खडबडून जागी झाली आहे. ‘मुंबईकरांनो, समुद्रात जाणे टाळा, शिवाय पाणी भरलेल्या ठिकाणीही जाणे टाळा. आपली काळजी घ्या. मदत लागल्यास १९१६ या हेल्पलाइनवर संपर्क साधा,’ असे पालिकेने आपल्या सोशल मीडियाच्या अकाउंटवरून मुंबईकरांना आवाहन केले आहे.बुधवारी राज्यात सिल्लोड (जि. औरंगाबाद), लातूर, जळगाव, सांगली, सातारा येथे मुसळधार पाऊस झाल्याचे वृत्त आहे. कोल्हापूर जिल्ह्यातही संततधार पाऊस सुरू आहे.>अतिवृष्टीचा इशारागुरुवार : पालघर, ठाणे, रत्नागिरी या जिल्ह्यांत तुरळक ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस कोसळेल. सिंधुदुर्ग, औरंगाबाद, बीड या जिल्ह्यांत तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस कोसळेल.>शुकवार : मुंबई, ठाणे, पालघर, रत्नागिरी, नाशिक, पुणे, सातारा या जिल्ह्यांत तुरळक ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस कोसळेल.>शनिवार : पालघर, रत्नागिरी जिल्ह्यांत तुरळक ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस कोसळेल.