महाराष्ट्रात सर्वदूर पाऊस, मराठवाड्याची पुन्हा बाजी
By ऑनलाइन लोकमत | Published: September 16, 2020 04:18 PM2020-09-16T16:18:59+5:302020-09-16T16:19:28+5:30
राज्यात १४ टक्के जास्त पाऊस, मुंबईत १०२.५० टक्के
बळीराजा सुखावला
मुंबई : यंदा मुंबईसह महाराष्ट्रात पुरेपुर मान्सून बरसतो आहे. मराठवाड्यात तर मान्सूनने सुरुवातीपासूनच आपली आगेकुच कायम ठेवली आहे. हवामान खात्याकडील बुधवारच्या माहितीनुसार महाराष्ट्रात सर्वदूर चांगला पाऊस नोंदविण्यात आला आहे. प्रारंभीपासून जास्त पावसाच्या बाबतीत आघाडीवर असलेल्या मराठवाड्यात पुन्हा एकदा जास्तीचा पाऊस नोंदविण्यात आला आहे.
राज्यात सरासरीच्या तुलनेत १४ टक्के जास्त पावसाची नोंद झाली आहे. १ जूनपासून आतापर्यंत सर्वसाधारणरित्या ९२६.६ मिमी पाऊस पडतो. यावेळी हा पाऊस १ हजार ५३.३ मिलीमीटर एवढा नोंदविण्यात आला आहे. मुंबईतदेखील पावसाची चांगली नोंद झाली आहे. मुंबई शहरात सरासरीच्या तुलनेत ५८ तर मुंबईच्या उपनगरात ५६ टक्के जास्त पाऊस नोंदविण्यात आहे. पालघरमध्ये १४ टक्के, ठाणे १७ टक्के आणि रायगड जिल्हयात सरासरीच्या तुलनेत १४ टक्के जास्त पावसाची नोंद झाली आहे. मुंबईत विश्रांती घेत पाऊस कोसळत आहे. बुधवारी हलकेसे पडलेले ऊनं वगळता मुंबई ढगाळ होती. आतापर्यंत मुंबईत सरासरी १०२.५० टक्के पावसाची नोंद झाली आहे.
.......................
मंगळवारी सायंकाळी ऊशिरा ३ ते ४ तासांत पनवेलमध्ये १११ मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. राज्यात सर्वदूर चांगला पाऊस होत असून, गुरुवारीदेखील राज्यात चांगल्या पावसाची शक्यता आहे.
- कृष्णानंद होसाळीकर, उप महासंचालक, मुंबई प्रादेशिक हवामान शास्त्र विभाग
मराठवाडा (सरासरीच्या तुलनेत अधिक पाऊस टक्क्यांत)
औरंगाबाद ६३
जालना ३३
नांदेड १
बीड ४२
लातूर २१
उस्मानाबाद १८
.......................
तीन जिल्हयांत पावसाची घट टक्क्यांत
अकोला -२७
अमरावती -२३
यवतमाळ -२६
.......................