एसटीच्या उत्पन्नालाही पावसाचा फटका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 28, 2021 04:06 AM2021-07-28T04:06:50+5:302021-07-28T04:06:50+5:30
मुंबई : गेल्या काही दिवसांपासून राज्यात सुरू असलेल्या पावसामुळे अनेक ठिकाणी पूरस्थिती निर्माण झाल्याचा फटका एसटीला बसला आहे. एसटीच्या ...
मुंबई : गेल्या काही दिवसांपासून राज्यात सुरू असलेल्या पावसामुळे अनेक ठिकाणी पूरस्थिती निर्माण झाल्याचा फटका एसटीला बसला आहे. एसटीच्या रोजच्या उत्पन्नात घट होऊन ते साडेसात कोटी रुपयांवर आले आहे.
या पूरस्थितीपूर्वी एसटीचे रोजचे उत्पन्न ९ कोटींपर्यंत होत होते. मात्र, एसटीच्या डिझेल खर्चच दररोज ७ कोटी आहे. कोरोनापूर्वी एसटी वाहतूक पूर्णपणे सुरू असताना एसटीला दररोज २१ कोटींचे उत्पन्न मिळत होते. मात्र, तेव्हाही अपेक्षित उत्पन्नापेक्षा ४ कोटींची तूट होती.
आता प्रवासी संख्या जरी कमी असली तरी दहा हजार बसगाड्या धावतात आणि त्यासाठी दिवसाला आठ लाख लिटर डिझेल लागते. आता डिझेलचा दर प्रतिलिटर ९७ रुपयांपर्यंत पोहोचला आहे. त्यामुळे महामंडळावरील आर्थिक भार वाढला आहे. उत्पन्न कमी झाल्याने महामंडळाला मार्च २०२० पासून ते आतापर्यंत चार हजार कोटी रुपयांचा फटका बसला आहे.