लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : मुंबई शहर आणि उपनगरात गुरुवारी पडलेल्या पावसाने शुक्रवारी सकाळपर्यंत जोर कायम ठेवला. मात्र दुपारी आणि सायंकाळी विश्रांती घेतली होती. दुपारी मुंबईच्या उपनगरात ऊन पडले होते. सायंकाळी ६ नंतर मात्र पुन्हा उपनगरात काही ठिकाणी पावसाच्या हलक्या सरी कोसळल्या. गोरेगाव येथे इमारतीच्या सिलिंगच्या भाग पडून अरसलन अन्सारी (८) या मुलाचा मृत्यू झाला.
मुंबईतील पावसाच्या कालावधीत तीन ठिकाणी बांधकामाचा काही भाग कोसळला. गोरेगाव पश्चिम येथील राम मंदिराजवळ असलेल्या न्यू अमन इमारतीमधील खोली क्रमांक ७१२ च्या सिलिंगच्या प्लास्टरचा भाग पडून दोन जण जखमी झाले. जखमींना कुपर रुग्णालयात नेण्यात आले. मात्र शुक्रवारी सकाळी ५.२० च्या सुमारास जखमींपैकी अरसलन अन्सारी (८) या मुलाचा रुग्णालयात दाखल करण्यापूर्वी मृत्यू झाला. तर फायमिदा अन्सारी यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, त्यांची प्रकृती स्थिर आहे. पाऊस कोसळत असतानाच ११ ठिकाणी शॉर्टसर्किटच्या घटना घडल्या. तर ६ ठिकाणी झाडांच्या फांद्या कोसळल्याच्या घटना घडल्या.