मुंबईकरांची पाऊसकोंडी; तुंबलेल्या पाण्यातून गाठले घर

By ऑनलाइन लोकमत | Published: July 22, 2023 11:15 AM2023-07-22T11:15:45+5:302023-07-22T11:16:04+5:30

तुंबलेल्या पाण्यातून गाठले घर, प्रशासनाच्या नावाने मोडली बोटे

Rain crisis of Mumbaikars; A house reached through flooded water | मुंबईकरांची पाऊसकोंडी; तुंबलेल्या पाण्यातून गाठले घर

मुंबईकरांची पाऊसकोंडी; तुंबलेल्या पाण्यातून गाठले घर

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : गुडघ्याभर पाण्यातून वाट काढणारे मुंबईकर, फलाटावर मान उंचावून लोकल दिसते का? याचा अंदाज घेणारे मुंबईकर, बेस्ट बसच्या स्टॉपवर साचलेल्या पाण्यात बेस्टची वाट बघणारे मुंबईकर, रस्त्यांवरून वेगाने वाहणाऱ्या पावसासह गटाराच्या पाण्यातून वाट काढणारे मुंबईकर... आता पाऊस थांबेल, या आशेने आकाशाकडे डोळे लावून बसणाऱ्या मुंबईकरांनी शुक्रवारी भरपावसात पुन्हा एकदा तुंबलेल्या मुंबईतून घर गाठत; प्रशासनाच्या नावाने बोटे मोडली.

मुंबई शहर आणि उपनगरांत सकाळपासून पावसाची रिमझिम सुरू असतानाच दुपारी साडेबारानंतर पावसाने मात्र तुफान बॅटिंग सुरू केली. अरबी समुद्राहून दाटून आलेल्या ढगांनी मुंबईवर काळोख केला. सोबत सोसाट्याच्या वाऱ्याने आपला वेग वाढविला आणि सोबत टपोऱ्या थेंबांनी वेगवान बरसत मुंबईची तुंबई करण्यास सुरुवात केली. मुंबई शहरात पावसाचा जोर कमी असला, तरी पूर्व उपनगरात बीकेसी, सायन, कुर्ला, विद्याविहार, घाटकोपर, विक्रोळी, कमानी, साकीनाका, चेंबूरसह जवळच्या परिसरात दुपारी साडेबारापासून तीनपर्यंत पावसाची तुफान बरसात सुरू होती. काळ्याकुट्ट ढगांनी तब्बल तीन तासांहून अधिक काळ झोडपून काढलेल्या पावसामुळे मुंबईचा वाहने बंद पडली

सायनपासून कमानीपर्यंत ठिकठिकाणी साचलेल्या पाण्यामुळे छोटी वाहने भररस्त्यात बंद पडली होती. यात रिक्षा, टॅक्सी, दुचाकी, खासगी वाहनांचा समावेश होता. रस्त्यात बंद पडलेल्या वाहनांमुळे लालबहादूर शास्त्री मार्गावर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. पुन्हा एकदा हिंदमाता महापालिकेने कितीही उपाययोजना केल्या तरी हिंदमाता परिसरात पावसाचे पाणी साचून मुंबईची तुंबई होण्याच्या घटना घडतच आहेत. बुधवारी पडलेल्या पावसामुळे हिंदमाता जलमय झाले होते. शुक्रवारी दुपारीही सर्वसाधारण हीच परिस्थिती पाहण्यास मिळाली.

कुर्ला, सायन, कमानी परिसरात पावसाचे पाणी गटरातून बाहेर आले होते. हेच गटाराचे पाणी रस्त्यांवर पसरले होते. याच गटराच्या पाण्यातून मुंबईकर वाट काढत होते. लहान मुले याच पावसाच्या पाण्यात दंगामस्ती करीत असल्याचे चित्र होते.

किंग्ज सर्कल आणि कोंडी

किंग्ज सर्कल परिसरातही गुडघ्याएवढ्या साचलेल्या पावसाच्या पाण्यातून नागरिकांनी वाट काढली. किंग्ज सर्कल परिसरात दरवर्षी मोठ्या प्रमाणावर पावसाचे पाणी साचत असून, याचा मुंबईच्या वाहतूक व्यवस्थेला मोठा फटका बसला. वाहनांच्या रांगा लागल्याने नोकरदारांना घरी जाण्यासाठी उशीर झाला.

‘शीतल’, ‘कल्पना’चे करायचे काय?
लालबहादूर शास्त्री मार्गावर कुर्ला डेपो, कल्पना सिनेमा परिसरात गुडघाभर पाणी साचले होते. याच पाण्यातून बेस्ट, रिक्षा, टॅक्सी वाट काढत होती.

ठिकठिकाणी चक्काजाम झाला

शुक्रवारी दुपारी २:२७ वाजता समुद्राला भरती होती. याच काळात मोठा पाऊस पडला.

मुंबईत ताशी ४५ ते ५५ किमी वेगाने वारे वाहत होते.

गुरुवारी सकाळी ८:३० पासून शुक्रवारी सकाळी ८:३० पर्यंत मुंबईत २७, पूर्व उपनगरात २९ आणि पश्चिम उपनगरात २७ मिमी पावसाची नोंद झाली.

तुफान पावसाची नोंद
मुंबई     ११५
माटुंगा     १०४
ग्रँटरोड     ८६
कुलाबा     ९८
फोर्ट     ८५
घाटकोपर     १३०
कुर्ला     ११६
मरोळ     ९३
अंधेरी     ९१
सी विभाग     ९२
एम पूर्व     १०४
एम पश्चिम     १०१
एच पश्चिम     १२४
एच पूर्व     १०२
के पूर्व     ९८

बेस्ट थांबली
  सायन रोड क्रमांक २४ येथे पावसाचे पाणी साचले होते. सायन सर्कल ते सायन स्टेशनदरम्यानची बेस्टची वाहतूक बंद केली होती. 
  सुमारे ९ बेस्टचे बसमार्ग बदलण्यात आले होते. शेल कॉलनी, हिंदमाता आणि सायन येथून प्रवास करणाऱ्या बेस्ट बसला पावसाचा  फटका बसला.

पाण्याचे लोंढे
कुर्ला पश्चिमेकडील शीतल सिनेमा, सिग्नल परिसरात गुडघ्याएवढे पाणी साचले होते. कमानीवरून खाली येणाऱ्या पाण्याच्या लोंढ्यामुळे मुंबईकरांना आपला तोल सांभाळणे कठीण झाले होते. एकमेकांना मदत करत पुढे जात होते.

बीकेसी : बस पकडायची कशी?
कुर्ल्याहून वांद्रे रेल्वेस्थानकडे जाताना बीकेसीमधील डायमंड मार्केट परिसरात बेस्ट बसस्टॉपजवळ मोठ्या प्रमाणावर पावसाचे पाणी साचल्याने प्रवाशांना बेस्ट बस पकडण्यात अडचणी येत होत्या.

उंच लाटा
नरिमन पॉइंट परिसरात समुद्राच्या उंच लाटा उसळत असतानाच येथे होणाऱ्या गर्दीला अटकाव करण्यासाठी पोलिस बंदोबस्त तैनात केला होता.

Web Title: Rain crisis of Mumbaikars; A house reached through flooded water

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.