Join us

पावसाने अनेक ठिकाणी शेतीेचे नुकसान

By ऑनलाइन लोकमत | Published: October 26, 2019 2:54 AM

मराठवाड्यात नद्यांना पूर; विदर्भात पिकांना फटका, कोकणाला चक्रीवादळाचा तडाखा

मुंबई / रत्नागिरी / अकोला / औरंगाबाद : राज्यातून नैर्ऋत्य मोसमी मान्सून माघारी गेला असला तरी ऐन दिवाळीत वादळी पाऊस सुरूच आहे. मराठवाड्यात बीड व परभणी जिल्ह्यात शुक्रवारी झालेल्या पावसाने नद्यांना पूर आला. विदर्भात सोयाबीन, कापूस, ज्वारी, फळे, भाजीपाला पिकांचे नुकसान झाले. पश्चिम किनारपट्टीवर घोंघावणाऱ्या ‘क्यार’ चक्रीवादळाने रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्याला तडाखादिला असून किनारपट्टीवरील लोकवस्तीत शुक्रवारी समुद्राचे पाणी शिरले.

बीड जिल्ह्यात पुराच्या पाण्यात एक जण वाहून गेला. परभणी जिल्ह्यातील १२ गावांचा संपर्क तुटला. हिंगोली आणि जालना जिल्ह्यातही पावसाने हजेरी लावली. परतीच्या पावसाने लातूर जिल्ह्यात मांजरा नदीवरील बॅरेजेस भरले. लातूरला पाणीपुरवठा करणाºया मांजरा धरणात साठा वाढला आहे.

नाशिक जिल्ह्यात मानोरी येथे भिंत कोसळून कलावती लोहारकर (७५) यांचा मृत्यू तर ४ जखमी झाले. खान्देश, वºहाडात पावसामुळे पिकांचे नुकसान; पंचनामे होईनात

जळगाव/ अकोला : गेल्या तीन दिवसांपासून जळगाव जिल्ह्यासह खान्देश आणि वºहाडात पडत असलेल्या पावसामुळे काढणीवर आलेल्या ज्वारी, बाजरी, मका आणि कडधान्य पिकाचे नुकसान होत आहे. काही ठिकाणी पिकांना कोंब फुटले असून पंचनामे होत नसल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे.

गेल्या आठ दिवसांपासून पाऊस झोडपत असल्याने खरीप पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. खान्देशातील ६० टक्के शेतमाल बाधित होईल, असा अंदाज आहे. एकट्या रावेर तालुक्यात सुमारे ४०० कोटींचे नुकसान झाल्याचा अंदाज आहे. गत आठ ते दहा दिवसांपासून वादळी वारे आणि विजांच्या कडकडाटासह होत असलेल्या पावसामुळे पश्चिम विदर्भातील (वºहाड) सोयाबीन, कापूस, ज्वारी, फळे, भाजीपाला पिकांचे मोठे नुकसान झाले आहे.

सद्य:स्थितीत सोयाबीन काढणीचा हंगाम सुरू आहे. शेतात कपाशीचे पीकही फुलले आहे; परंतु सारखा पाऊस सुरू असल्याने शेतकऱ्यांनी काढलेले सोयाबीन शेतातच सडले असून, त्याला कोंब फुटले आहेत. ज्वारी, कपाशीची बोंडे काळी पडली आहेत. कपाशी परिपक्वहोण्याअगोदरच बोंडांमधून कपाशी बाहेर आली. पावसामुळे पपई, लिंबू, संत्रा फळपिकाला फटका बसला असून, पपई आणि लिंबू पिकाची फळगळ झाली आहे. अंबिया बहारातील संत्र्याचे मोठे नुकसान झाल्याचे चित्र दिसत आहे.

नाथसागरातून विसर्ग

मराठवाड्यात शुक्रवारी बीड आणि परभणी जिल्ह्यात दमदार पाऊस झाला. बीड जिल्ह्यात एक जण वाहून गेला. परभणी जिल्ह्यात १२ गावांचा शहराशी संपर्क तुटला. हिंगोली आणि जालना जिल्ह्यातही पावसाने हजेरी लावली. हिंगोली, जालना जिल्ह्यातही सरी पडल्या. पैठण येथील नाथसागर धरणाचे १६ दरवाजे गुरुवारी पहाटे अडीच फुटांनी उघडून गोदावरी नदी पात्रात ४३ हजार ५०९ क्युसेक पाणी सोडले जात आहे. त्यामुळे दोन महिन्यांत तिसºयांदा पांचाळेश्वर मंदिर व राक्षसभुवनच्या शनी मंदिराच्या दुसºया मजल्यावर पाणी गेले आहे. तब्बल १२ वर्षांनंतर गोदावरी तिसºयांदा दुथडी भरून वाहत आहे.

 

टॅग्स :पाऊसमुंबई मान्सून अपडेटकोकणशेतकरी