Join us  

मरायला टेकू लागली रोपं... बरसणार कधी, किती पहायची वाट? पिकांना आता पावसाची अत्यंत गरज

By ऑनलाइन लोकमत | Published: August 13, 2023 5:45 AM

गेले दहा-पंधरा दिवस दडी मारल्याने शेतकरी वर्ग संकटात सापडला आहे. दुबार पेरणीचे संकट वाढले आहे.

लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई : राज्यातील जवळपास २१ जिल्ह्यांमध्ये पावसाने गेले दहा-पंधरा दिवस दडी मारल्याने शेतकरी वर्ग संकटात सापडला आहे. दुबार पेरणीचे संकट वाढले आहे. राज्यात ऑगस्टमध्ये आतापर्यंत सरासरीच्या केवळ १३ टक्के पाऊस झाल्याने चिंता वाढली आहे. 

जूनमध्ये सरासरीच्या ५४ टक्के पाऊस पडला होता. जुलैमध्ये राज्याच्या विशिष्ट भागांमध्ये ढगफुटीसदृश पाऊस झाला. त्यामुळे एकूण सरासरीच्या १३९ टक्के पाऊस पडला तरी राज्यातील अनेक भागांत समाधानकारक पाऊस बरसला नाही. 

ऑगस्टमध्ये ११ तारखेपर्यंत राज्यात ३७.४ मिलिमीटर इतकाच पाऊस झाला असून तो सरासरीच्या १३ टक्केच आहे. पुढील आठ दिवसांत पुरेसा पाऊस पडला नाही तर बळीराजा आणखीच चिंताक्रांत होईल. कोकण, नाशिक व छत्रपती संभाजीनगर महसूल विभागात हलका पाऊस झाला. पुणे, कोल्हापूर, लातूर, अमरावती व नागपूर विभागात जवळपास पाऊसच नाही अशी अवस्था आहे.

पिकांना आता पावसाची अत्यंत गरज

nराज्यात आतापर्यंत १३६ लाख हेक्टरवर पेरणी झाली असली तरी पिकांना आता पावसाची अत्यंत गरज आहे. कोकणात सरासरीच्या ११५ टक्के, नाशिकमध्ये ७१, पुणे ७८, छत्रपती संभाजीनगर ७६, लातूर ८८, अमरावती ९३ तर नागपूर विभागात सरासरीच्या ९६ टक्के पाऊस १ जून ते ११ ऑगस्ट या काळात झाला.

साखर हंगाम अडचणीत येण्याची शक्यता

जून व जुलैमध्ये पावसाने ओढ दिली आहे. धरणांच्या पाणीसाठ्यातही अद्याप पुरेशी वाढ झालेली नाही. त्यामुळे यंदाचा साखर हंगाम अडचणीत येण्याची शक्यता आहे. साखर उद्योगातील संबंधितांशी चर्चा करून पुढील निर्णय घेण्यात येईल, अशी माहिती सहकारमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी दिली.

पावसाची प्रतीक्षा सर्वांनाच आहे. नजीकच्या काळात पाऊस पडला नाही तर करावयाच्या उपाययोजनांचे नियोजन कृषी विभागाने केले आहे. कोणत्याही परिस्थितीत सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी उभे राहील. - धनंजय मुंडे, कृषिमंत्री.

 

टॅग्स :शेती क्षेत्रमोसमी पाऊस