पाऊस झाला गायब
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 7, 2021 04:07 AM2021-07-07T04:07:39+5:302021-07-07T04:07:39+5:30
८ किंवा ९ जुलैनंतर सक्रिय होण्याची शक्यता लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : वाऱ्याच्या वेगाने मान्सून मुंबईसह महाराष्ट्रात दाखल झाल्यानंतर ...
८ किंवा ९ जुलैनंतर सक्रिय होण्याची शक्यता
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : वाऱ्याच्या वेगाने मान्सून मुंबईसह महाराष्ट्रात दाखल झाल्यानंतर त्याने अक्षरशः धुमाकूळ घातला. मात्र आता गेल्या काही दिवसांपासून विशेषतः जुलै महिन्याच्या सुरुवातीपासून पावसाने मुंबई आणि महाराष्ट्रात दडी मारली आहे. अनुकूल वातावरण तयार होत नसल्याने मान्सूनमध्ये खंड पडल्याचा अंदाज भारतीय हवामानशास्त्र विभागाने व्यक्त केला असतानाच ८ किंवा ९ जुलैनंतर पाऊस पुन्हा सक्रिय होईल, अशी शक्यतादेखील हवामान खात्याने वर्तविली आहे.
जुलै महिन्याच्या सुरुवातीपासूनच पावसाने मोठा ब्रेक घेतला आहे. मुंबई, मराठवाडा आणि आसपासच्या प्रदेशात गेल्या कित्येक दिवसांपासून पावसाचा पत्ता नाही. मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या धरण क्षेत्रातील जलसाठादेखील आता खाली उतरू लागला आहे. पावसाने घेतलेला ब्रेक जल कपातीचे संकट तर घेऊन येणार नाही ना, अशी भीतीदेखील व्यक्त केली जात आहे. मुंबईत गेल्या काही दिवसांपासून पावसाचे ढग दाटून येत आहेत. मात्र प्रत्यक्षात पाऊस गायब आहे. मुंबई शहर आणि उपनगरात मध्यरात्री व पहाटे काही ठिकाणी तुरळक सरी कोसळल्या असल्या तरीदेखील त्याचे प्रमाण कमी आहे.
पावसाने मोठी विश्रांती घेतल्याने मुंबईच्या कमाल आणि किमान तापमानात काही अंशी वाढ नोंदविण्यात आली आहे. मुंबईचे कमाल तापमान ३३ आणि किमान तापमान २७ अंशाच्या आसपास आहे. उकाड्याने मुंबईकरांना घाम फोडला आहे. मंगळवारी सकाळी किंचित सरी घेऊन आलेल्या पावसाने दुपारी आणि सायंकाळी पुन्हा विश्रांती घेतली.