भुयारी मेट्रोसाठी पावसाळी आपत्ती नियंत्रण कक्ष सज्ज
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 1, 2020 05:07 AM2020-07-01T05:07:01+5:302020-07-01T05:07:14+5:30
मुंबईच्या रेल्वेतून सुमारे ७५ लाख प्रवाशांना रोजचा प्रवास करावा लागतो. ३३.५ कि.मी. लांबीचा हा मेट्रो मार्ग उपनगरीय रेल्वेमधील गर्दी कमी करू शकतो
मुंबई : मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशनद्वारे कुलाबा-वांद्रे-सीप्झ या भुयारी मेट्रो-३ची उभारणी करण्यात येत असून, आता भुयारी मेट्रोसाठी पावसाळी नियंत्रण कक्ष स्थापन करण्यात आला आहे. एकूण ४२८ जलशोषण पंप आणि १५ तात्काळ सेवा वाहने यांचे आयोजन मुंबई मेट्रो ३च्या सात पॅकेजेससाठी करण्यात आले आहे, अशी माहिती कॉर्पोरेशनकडून देण्यात आली.
मेट्रो-३च्या भुयारीकरणासह उर्वरित काम वेगाने सुरू असून, आतापर्यंत भुयारीकरणाचे काम ८३ टक्के झाले आहे. तर प्रकल्पाच्या एकूण कामांपैकी ५६ टक्के काम पूर्ण झाले आहे. मेट्रो-३ ही वांद्रे-कुर्ला संकुलात मेट्रो २-बला जोडली जाईल. याव्यतिरिक्त चर्चगेट, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, मुंबई सेंट्रल रेल्वे स्थानक, महालक्ष्मी येथील मोनोरेल स्थानक, मेट्रो-१ला मरोळ, मेट्रो-६ला आरे येथे मेट्रो-३ जोडली जाईल. शिवाय विमानतळाशीही मेट्रो-३ कनेक्ट असेल.
मुंबईच्या रेल्वेतून सुमारे ७५ लाख प्रवाशांना रोजचा प्रवास करावा लागतो. ३३.५ कि.मी. लांबीचा हा मेट्रो मार्ग उपनगरीय रेल्वेमधील गर्दी कमी करू शकतो. मुंबई मेट्रो-३ प्रकल्प पूर्णपणे कार्यान्वित झाल्यानंतर मोठ्या प्रमाणावर रहदारीचे प्रमाण कमी झाल्याचे दिसून येईल. मुंबई मेट्रो-३ प्रकल्पामुळे सुमारे १६ लाख रेल्वे प्रवाशांना वातानुकूलित डब्यातून प्रवास करणे शक्य होईल. प्रवासाच्या वेळेत घट, ध्वनी व हवेच्या प्रदूषणात घट, सुरक्षित व आरामदायी प्रवास अशा अनेक सोयीसुविधा उपलब्ध होतील. संपूर्णपणे भुयारी मेट्रो मार्गावर २७ स्थानके असतील.
पाच स्थानकांचा बदल
पाच स्थानके उपनगरीय रेल्वेशी अदलाबदल करण्यासाठी असतील. भुयारी प्रकल्पाची बांधणी करताना अस्तित्वात असलेल्या इमारतींचे संरक्षण होण्यासाठी अत्याधुनिक तंत्रज्ञान वापरण्यात येत आहे, असा दावाही एमएमआरसीने केला आहे.